अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी संगमनेर येथे सुरू असलेल्या सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी (दि. 9) नाराजी व्यक्त केली. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाच्या पातळीवर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रकल्पाच्या पुर्नअभ्यासासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल महिनाभरात अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आंदोलन करण्याची घाई का केली जात आहे, असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.
विखे पाटील रविवारी अहिल्यानगर दौर्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. मोनिका राजळे, आ.संग्राम जगताप उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, नारायणगाव येथील ‘अर्थ स्टेशन’च्या मुद्द्यामुळे रेल्वे विभागाने नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प यापूर्वी अयोग्य ठरवला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे रेल्वे मंत्रालयाच्या भूमिकेत बदल घडवून आणण्यात यश आले आहे. प्रकल्पाचा पुर्नअभ्यास करण्यासाठी डॉ. काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेणे शक्य होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. प्रकल्पासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असताना ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनावर विखे पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत असताना आंदोलनामुळे नेमके काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी केला.
जरांगेंचे आरोप फेटाळले
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौर्यादरम्यान सरकार आपल्याला अटक करण्यासाठी अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोप केला होता. हे आरोप विखे पाटील यांनी फेटाळून लावले. आंदोलकांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शासनाची असून सरकारकडून कोणताही अडथळा निर्माण केला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील मराठा समाजाच्या 58 लाख नोंदींचा डाटा जरांगे पाटील यांना यापूर्वीच पेनड्राईव्ह तसेच हार्ड कॉपीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार अत्यंत सकारात्मक असून कायदेशीर बाबींचा मार्ग काढण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून काम सुरू आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.
परदेशी हल्ल्याचा सूत्रधार शोधा
अहिल्यानगर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची पालकमंत्री विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली. खासगी उपचार सुरू असताना विखे पाटील यांनी परदेशी यांची रविवारी सकाळी भेट घेतली. परदेशी यांच्या कुटुंबीयांशीही त्यांनी संवाद साधला. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह चौघांना अटक केली असली, तरी केवळ हल्लेखोरांना अटक करून प्रकरण थांबवू नये, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, त्याचा शोध घेण्याबरोबरच गुन्हेगारांना आर्थिक किंवा सामाजिक पाठबळ देणार्या व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस प्रमुखांना या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही विखे पाटील यांनी दिला.




