सोलापूर | Solapur
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सध्या पंचनामे सुरू आहेत. प्रशासनाकडून पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच पूरबाधितांची अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केलीये. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यासोबतच लोकांना तात्काळ मदत करण्याच्या सुचना ही केल्या आहेत. त्यातच शिंदेसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी सोलापूर जिल्ह्याची पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून वाघमारे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारेंना सुनावल्याचे पाहायला मिळाले. राजकारण करू नका, तुमची मदत वाढवा असा सल्ला जिल्हाधिकऱ्यांनी ज्योती वाघमारेंना दिला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षाकडून अन्नधान्याचे किट वाटप केले जात होते. यावेळी ज्योती वाघमारे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना त्यांनी फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. “कलेक्टर साहेब, या गावाची लोकसंख्या इतकी मोठी आहे, प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात आहेत, असे म्हणत ज्योती वाघमारे यांनी जास्तीची मदत मिळावी, अशी मागणी केली.
त्याच दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना अपुऱ्या मदतीच्या मुद्यावर फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उलट त्यांनाच झापले.
ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांन फोन करत कॉल स्पीकरवर ठेवला. या गावाची लोकसंख्या इतकी मोठी असून प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात असल्याची तक्रार ज्योती वाघमारे यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्तर देताना, आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत असे सांगितले. तुम्ही सध्या त्या गावात आहात तर तुम्ही किती किट आणल्या आहेत, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी केला. त्यावर ज्योती वाघमारे या तोंडघशी पडल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांना थेट म्हटले की, तुमच्या पक्षाकडूनही मदत करा ना…३ हजार लोक असताना तुम्ही फक्त २०० किट घेऊन आले. नुसते २०० किट नको तर ३ हजार लोकांची व्यवस्था करा. हेच नाही तर आम्ही लोकांना बाहेर काढले, तुम्ही नाही, असेही त्यांनी यादरम्यान ज्योती वाघमारे यांनी म्हटले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोन वरून बोलताना उलट ज्योती वाघमारेना खडे बोल सुनावले, आता ही राजकारण करण्याची वेळ नाही, तुमचे राजकारण नंतर करा, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुनावले. पूरग्रस्तांना आम्ही बाहेर काढले, तुम्ही काढले नसल्याचंही आशीर्वाद यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




