श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याची 48 तासाच्या आत उकल करुन चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला.
दि. 9 ते 12 जून दरम्यान शहरातील वॉर्ड नं.02, जुने घरकुल परिसरातील रुकय्या जब्बार शेख या त्यांच्या घराला कुलूप लावून लोणी येथे नातेवाईकाकडे गेल्या होत्या. रुकय्या शेख या घरी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराची कडी तोडून सुमारे दोन लाख चार हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने रोख रकमेसह चोरुन नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल शफीक शेख, पोलीस नाईक भैरव अडागळे, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारे, अकबर पठाण, रविंद्र शिंदे, बाळासाहेब गिरी यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करुन सदर गुन्ह्यातील चोरी ही गुन्ह्यातील फिर्यादी रुकय्या शेख यांचा जावई साद शौकत शेख याने केलेली असल्याचे निष्पन्न केले.
त्यावरुन आरोपी साद शौकत शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सासू रुकय्या शेख हिने उसने पैसे दिले नाही, म्हणून त्याचा राग येऊन गुन्हा केला असल्याची कबुली त्याने दिली. त्याने 1 लाख 94 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हजर केले असून सदरचे सोन्याचे दागिने फिर्यादी रुकय्या जब्बार शेख यांनी ओळखून त्यांचेच असल्याचे त्यांनी खात्री केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम हे करत आहेत.




