Friday, May 3, 2024
Homeनगरसोनई ग्रामपंचायतीत ना. शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व अबाधित

सोनई ग्रामपंचायतीत ना. शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व अबाधित

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत ‘विरोध जिवंत ठेवायचा’ या मुद्द्यावर माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधक एकवटले होते.

- Advertisement -

मात्र सोनईकरांनी मतदानातून आपला कौल देत पुन्हा एकदा मंत्री गडाख गटाकडे एकहाती सत्ता दिली. तुकाराम गडाख गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

ना. शंकरराव गडाख गटाने या निवडणुकीत 17 पैकी 16 जागांवर मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय मिळविला. मागील 17 सदस्यांपैकी नामदार गटाचे 16 व विरोधी गटाचा एक सदस्य होता.

दरंदले नवनाथ, दरंदले श्वेताली, ओहळ सावित्रा, वाघ धनंजय, पवार सुनीता, तागड जयश्री, वैरागर किशोर, राऊत सविता, हरकळे प्रसाद, सय्यद इंतेसाम, मच्छिंद्र कुसळकर, दरंदले विद्या, कुसळकर भाना, बोरुडे राजेंद्र, गडाख प्रभाकर, राशीनकर अलका हे नामदार गडाख गटाचे तर माजी खासदार तुकाराम गडाख गटाचे शेटे शोभा निवडून आल्या.

यावेळेस मंत्री गडाख यांना घेरण्यासाठी माजी खासदार तुकाराम गडाख यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे समर्थकांसह सर्व गडाख विरोधकांची मोट बांधत पॅनल तयार केला.

मात्र मंत्री गडाख गटाने मुस्लिम, दलित, धनगर सह सर्व समाजातील घटकांना उमेदवारी देत न्याय दिला. याउलट तुकाराम गडाख गटाकडून नेहमीच्याच चेहेर्‍याना संधी दिली गेली. माजी खासदार तुकाराम गडाख यांनी जुना विरोध तिखट करत घरोघरी जाऊन मते मागितली तसेच प्रचार फेर्‍या काढल्या. ही निवडणूक अगदी अटीतटीची होईल असे चित्र निर्माण केले. मात्र तुकाराम गडाख व त्यांच्या समर्थकांना सोनईकरांनी नेहमीप्रमाणे नाकारत मंत्री गडाख यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत एकतर्फी विजय बहाल केला.

विशेष म्हणजे तुकाराम गडाख यांनी त्यांच्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्यक्षात सहभाग घेतला नव्हता, मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकीय फड गाजविणार्‍या तुकाराम गडाखांना थेट गावपातळीचे राजकारणात प्रत्येक्ष सहभाग घेऊनही त्यातही त्यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांनी कुठेही गुलाल न उधळता, मिरवणूक न काढता फटाके फोडू नये आपला विजय संयमाने साजरा करावा व निवडणुकीतील राग न धरता सलोख्याचे संबंध ठेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन नामदार शंकरराव गडाख यांनी केले.

कुठलीही निवडणूक आली की विरोधकांचा एकच अजेंडा असतो. नामदार शंकरराव गडाख यांच्या विरोधात गरळ ओकायची. खोटेनाटे आरोप करायचे. खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्या विरोधात भाषणे करायची याची सोनईसह तालुक्याला सवय झाली आहे. परंतु सर्वसामान्य जनता विरोधकांच्या भूलथापेला बळी पडणार नाही.

– सुनील तागड सोनई

- Advertisment -

ताज्या बातम्या