दिल्ली । Delhi
शिक्षण सुधारक आणि प्रसिद्ध अभियंता सोनम वांगचुक यांना शुक्रवारी (२६ सप्टेंबर) लेह पोलिसांनी अटक केली आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश व्हावा, यासाठी झालेल्या हिंसक आंदोलनात लोकांना उत्तेजक विधानांद्वारे चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये झालेल्या या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर ९० हून अधिक लोक जखमी झाले होते. लडाखमधील या वाढत्या हिंसाचारानंतर मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील लेह एपेक्स बॉडी (LAB) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) यांनी लडाखच्या मागण्यांसाठी मोठे आंदोलन उभे केले होते.
या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी सोनम वांगचुक यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, आंदोलनात वाढलेल्या हिंसाचारामुळे त्यांनी हे उपोषण १५ दिवसांनी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी संपवले.
सरकारने सोनम वांगचुक यांच्यावर उत्तेजक आणि चिथावणीखोर भाषणे देऊन जमावाला हिंसक बनवल्याचा आरोप केला आहे. वांगचुक यांनी त्यांच्या भाषणात ‘अरब स्प्रिंग-स्टाईल आंदोलन’ आणि नेपाळमधील ‘जनरेशन झेड’ आंदोलन यांचा संदर्भ दिला होता. या वक्तव्यांमुळेच जमाव अधिक आक्रमक झाला आणि हिंसाचार वाढला, असे सरकारचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी एक अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या आणि राज्याचा दर्जा देण्याच्या मागण्यांवर लेह एपेक्स बॉडी (LAB) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) यांच्यासोबत सक्रिय संवाद साधत आहे. या संदर्भात उच्चस्तरीय समिती तसेच उप-समितीमार्फत औपचारिक बैठका घेण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे, तर अनेकवेळा नेत्यांशी अनौपचारिक चर्चाही झाली आहे, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.




