पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या ई पीक पहाणी केलेल्या सोयाबीन व कपाशी उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी पाच हजार रुपये पर्यंतचे अनुदान जाहीर केले आहे. मात्र घोषणा होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप अनुदान प्राप्त झालेले नसून शेतकर्यांना अगोदर ईकेवायसी व संयुक्त खातेदारांना प्रतिज्ञापत्र करण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे तीव्र स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला होता. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने कपाशी व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची वाटप प्रक्रिया सुरू झाली असून प्रत्येक गावातील कृषी सहाय्यक ई पीक पहाणी केलेल्या लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करीत आहेत. त्यात ज्या शेतकर्यांनी केवायसी केलेली नाही त्यांना अगोदर ई केवायसी करावी लागत आहे.
वाटप न झालेल्या संयुक्त खातेदारांपैकी एकाला सर्व खातेदार घेऊन शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करून द्यावयाचे आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत किचकट झाली आहे. गेल्या महिना दीड महिन्यापासून लाभार्थ्यांचे अनुदान रखडले आहे.त्यातच चालू वर्षीही ऑगस्ट महिन्यात 1 ऑगस्ट ते व 20 ऑगस्ट असा जवळपास 20 दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने चालू वर्षीही खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात जळाली होती. उंबरठा उत्पन्नावर त्याचाही विपरीत परिणाम होणार आहे. गेल्या वर्षीचे अनुदान पीक विमे अद्याप प्राप्त नाहीत. चालू वर्षाच्या पिकांची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाल्याचे चित्र आहे.