Thursday, October 1, 2026
HomeनगरAhilyanagar : पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत थेट अभिप्राय नोंदवा!

Ahilyanagar : पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत थेट अभिप्राय नोंदवा!

जिल्हा पोलिसांकडून जनमत सर्वेक्षण मोहीम सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील नागरिकांना आता पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीबाबत थेट अभिप्राय देण्याची संधी मिळणार आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पुढाकारातून जिल्हा पोलीस दलाने नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी विशेष जनमत सर्वेक्षण मोहिमेची सुरूवात केली आहे. 30 जून ते 9 जुलै या कालावधीत ही मोहीम राबवण्यात येणार असून, यामध्ये क्यूआर कोड व ऑनलाइन लिंकव्दारे सहभाग नोंदवता येणार आहे.

- Advertisement -

या मोहिमेचा उद्देश नागरिकांचे मत, सूचना व अभिप्राय गोळा करून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे आणि सेवा अधिक लोकाभिमुख बनवणे हा आहे. पोलिसांनी अंमलात आणलेल्या विविध उपाययोजना – जसे की वाहतूक नियंत्रण, महिला सुरक्षेबाबतचे उपाय, सायबर गुन्हेगारीविरोधातील कारवाई, तसेच अंमली पदार्थांविरोधात उचललेले पावले – यावर नागरिकांनी आपला अभिप्राय द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वेक्षणात भाग घेणार्‍या नागरिकांनी 50 शब्दांत पोलिसांच्या कामगिरीबाबत आपला अभिप्राय मांडावा लागेल.

तसेच, एकूण कार्यक्षमतेला 10 पैकी गुण द्यावेत. याशिवाय वाहतूक, महिला सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी कारवाई व सायबर गुन्हे या चार स्वतंत्र विभागांसाठीही 1 ते 10 या गुणश्रेणीत मूल्यांकन करावे लागेल. मत नोंदवताना नाव किंवा फोन नंबर देणे बंधनकारक नाही. मात्र, संबंधित पोलीस ठाण्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. नागरिकांनी दिलेले सर्व अभिप्राय गोपनीय ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस दलाच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढावे यासाठी ही अभिप्राय मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेव्दारे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढून विश्वासाची नवी पातळी निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सुधारणा ही निरंतर प्रक्रिया : एसपी घार्गे
या उपक्रमाबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले, नागरिकांना अधिक चांगली सेवा देणे ही आमची प्राथमिकता आहे. सुधारणा ही एक निरंतर प्रक्रिया आहे. पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व उत्तरदायी बनावे, यासाठीच ही मोहीम राबवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : ओझर-नवी दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू; खासदार भास्कर भगरेंच्या...

0
नाशिक | Nashik नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नागरिकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ओझर (नाशिक) विमानतळावरून (Air Port) नवी दिल्लीसाठी सकाळची विमानसेवा...