जामखेड/कर्जत |प्रतिनिधी| Jamkhed | Karjat
सीना नदीच्या महापुराचा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना मोठा फटका बसला. शेतकर्यांची प्रचंड हानी झाली उभी पिकं वाहून गेली आहेत तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या संकट काळात नुकसानग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे दोन दिवसांत पंचनामे पुर्ण करावेत, असे निर्देश बुधवारी (दि.17) सभापती राम शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागापूर, सितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना सभापती शिंदे यांनी भेट देऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुसळधार पावसामुळे शेती, चारा, जनावरांचे गोठे, रस्ते, पूल, बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चौंडी येथील शिल्पसृष्टीच्या बुरुजाला पाणी लागले असून चौंडी पुलावर 7 ते 8 फूट पाणी आल्याचेही या पाहणीत निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकार्यांना दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकार्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी तसेच पायाभूत सुविधांची दुरुस्ती व पुनर्बांधणी तातडीने सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रा. शिंदे म्हणाले, या आपत्तीत शासन ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे असून एकही शेतकरी, ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





