Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याबालमजुरीत अडकलेल्यांसाठी ग्रामीण पोलिसांची विशेष मोहीम

बालमजुरीत अडकलेल्यांसाठी ग्रामीण पोलिसांची विशेष मोहीम

नाशिक । फारूक पठाण Nashik

नाशिक जिल्ह्यातील बालमजुरीच्या सापळ्यामध्ये अडकलेल्या बालकांच्या सुटकेसाठी नाशिक ग्रामीण पोलीस उल्लेखनीय कामगिरी करत आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार केले आहे. तर नागरिकांना विश्वासात घेवून बालकामगार व वेठबिगारी निर्मूलनाविषयी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून त्याचा चांगला परिणाम ही दिसून येत आहे.

- Advertisement -

पथक नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील आदिवासी भागात तसेच अतिदुर्गम भागांतील वाड्या-वस्त्या व गावांना भेटी देवून तेथील स्थानिक पोलीस पाटील, आदिवासी समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांची मदत घेवून नागरीकांना विश्वासात घेवून बालकामगार व वेठबिगारी निर्मूलनाविषयी प्रबोधन करत आहेत. त्याचप्रमाणे, वेठबिगार संदर्भातील काही अप्रिय घटना घडणार नाही, याबाबत जनजागृती करीत आहेत. पथक हे बालकामगार व वेठबिगार निर्मुलन व जनजागृती मोहीम अधिक व्यापक करून ती अव्याहतपणे सुरू राहील, असे नाशिक ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे.

सटाण्यात गुन्हा दाखल

या विशेष मोहिमेदरम्यान सोमवारी (दि.1) रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील टॅगोडा शिवारात कृषी उत्पन्न बाजार समीतीचे गेटजवळ एका शेतात शेळ्या-मेंढ्या चारण्याचे काम करणार्‍या दोन अल्पवयीन बालकांची चाईल्ड हेल्प लाईन 1098, जिल्हा महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग यांच्या प्रतिनिधींच्या मदतीने रोजगारीच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले. या अल्पवयीन मुलांना संभाजी शिवाजी पाकळे, नंदलाल बाबुराव पाकळे (दोन्ही रा. धनगर गल्ली, सटाणा, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) यांनी त्यांच्या स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी शेळया मेंढ्यांच्या वाड्यावर शेळ्या, मेंढया चारण्यासाठी सालाने ठेवून घेवून अल्पवयीन मुलांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करून बालकामगारास कमी वेतन देवून त्यांच्याकडून श्रमाचे काम करून घेतले म्हणून सटाणा पोलीस ठाण्यात भादवि कलम 374, सह बालकांचे काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 79, बालकामगार अधिनियम 1986 चे कलम 3 प्रमाणे 2 गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक उमाप यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे, सपोउनि प्रमोद आहेर, पोहवा शिरीष गांगुर्डे, मपोना सविता ढिकले, मपोकॉ माधुरी भोसले, पोकॉ योगेश्वर तनपुरे यांनी कारवाई केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजात असणार्‍या गरिबी व दारिद्य्राचा फायदा घेऊन समाजातील अल्पवयीन मुलांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात गुंतविण्याचे प्रकार सध्या उघडकीस येत आहे. सर्वसाधारण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुले शाळेत जात नाहीत. गरिबीमुळे शाळा न शिकता मुले कामधंंदा करतात. समाजातील ही अनिष्ट प्रथा संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे.

शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या