Friday, May 17, 2024
Homeअग्रलेखरस्ते अपघात नियंत्रणाचे विशेष प्रयत्न आवश्यक!

रस्ते अपघात नियंत्रणाचे विशेष प्रयत्न आवश्यक!

रस्ते अपघात आणि त्यात बळी जाणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेलेल्या बळीमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या ६-७ दिवसात विविध ठिकाणी अशा काही घटना घडल्या. औरंगाबादहून एक वऱ्हाड नाशिकला येत होते. त्यांच्या गाडीचा आणि ट्रकचा अपघात झाला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि कित्येक जखमी झाले. दुसरी घटना तेलंगणातील करीमनगर येथे घडली. एका कारने पादचारी मार्गावर बसलेल्या महिलांच्या गटाला धडक दिली. त्यात चार महिला आणि एक बालक मृत्युमुखी पडले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ७-८ दिवसांपूर्वी वर्धा येथे भीषण अपघात झाला. त्यात सात विद्यार्थी जागीच ठार झाले. ते सगळे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांच्यातीलच एकाच वाढदिवस साजरा करून ते परतत होते. त्यांचे वाहन पुलावरून खाली कोसळले आणि जीवघेणा अपघात घडला. मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात परवाच पाच जणांचा बळी गेला. रस्ते अपघातांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. अपघातांची अनेक कारणे सांगितली जातात. तथापि वेगाची वाढती नशा हे त्यातील एक प्रमुख कारण मानले जाते. असे अपघात काहींना कायमचे अपंगत्व देतात तर काहींच्या घरी कायमचा अंधार होतो. तरुण पोरांच्या मृत्यूचे जीवघेणे दुःख सहन करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर येते. रस्ते अपघातात बळी पडणाऱ्या तरुणांची वाढती संख्या अस्वस्थ करणारी आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका अहवालानुसार २०१९ मध्ये देशात रस्ते अपघातात साधारणतः साडेचार लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यात १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे प्रमाण एकूण मृत्यूच्या ६० टक्के असल्याचे अहवालात नमूद आहे. तरुणांचा मृत्यू हे त्यांच्या कुटुंबियांचे न संपणारे दुःख तर असतेच पण देशाचेही नुकसान असते. अपघात कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न हवेत. देशात रस्ते बांधणी वेगाने वाढत आहे. ते वाहतुकीला सोयीचे ठरत आहेत. महामार्ग गुळगुळीत होत आहेत. तसे ते व्हायलाही हवेत. रस्ते विकासाचे मार्ग ठरतात. पण रस्ता धड झाला की त्यावरून वेगाने वाहन चालवण्याचे लोकांना जणू वेडच लागते. शहरातील गल्लीबोळांमध्ये धावणाऱ्या वाहनांचा वेग सुद्धा रस्त्याने चालणारांच्या अंगावर भीतीचा काटा आणतो. रस्त्याने चालावे की नाही अशा प्रश्न पादचाऱ्यांना पडतो. अपघात वाढत आहेत म्हणून रस्ते धड बांधले जाऊ नयेत का? वाहतुकीचे नियम का पाळले जात नाहीत? तसे वाहनचालकांना भागही का पाडले जात नाही? की वाहतुकीचे सर्व नियम माहीत नसलेले चालक वाहने चालवतात? वाहतुकीचे परवानेही सहज उपलब्ध होत असावेत का? असा परवाना काढणे फारसे कठीण नाही किंवा तो सहज मिळू शकतो असे तरुणांना का वाटते? तसे ते देताना परवाने मागणाराबद्दलची आवश्यक ती सर्व माहिती घेतली जाते का? अमुक एक व्यक्ती वाहन चालक परवाना घरपोच आणून देते असे सांगणारेही आढळतात. वाहन चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण करणारांना त्याचा परवाना मिळतो. पण महिनाभर गाडी चालवायला शिकले म्हणजे त्या व्यक्तीला बिनधोक वाहन चालवता येते असे यंत्रणेला कसे वाटते? काल परवाचा एक अपघात तरुणाईच्या नको तितक्या उत्साहावर पुरेसा प्रकाश टाकतो. गाडीवर ‘एल'(लर्निंग/शिकाऊ) असे लिहिले म्हणजे अपघात टळतील का? नवीन मोटार वाहन कायद्याने विना परवाना वाहन चालवले तर केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम दहा पट वाढवली आहे. तथापि केवळ आर्थिक दंडाने हा प्रश्न सुटेल का? वाहतूक परवाना देण्याचे नियम पुरेसे कडक आहेत का? त्यात कुठे उणिवा आहेत का? याचा शोध घेतला जाईल का? परवाना देण्याआधी वाहनचालकाला चाचणी परीक्षा द्यावी लागते. ती योग्य रीतीने दिली आणि घेतली जाते का? वाहन चालवण्याचे पुरेसे ज्ञान नसताना तरुण मुले गाड्या पळवतात, त्या पालकांच्या संमतीने की संमतीविना? याची कठोर तपासणी व्हायला हवी. तशी ती होते का? रस्ते अपघातांवर नियंत्रण आणणे ही केवळ यंत्रणेचीच जबाबदारी आहे का? मुले वाहन चालवतांना नियम पाळतात का? हेल्मेट घालतात का? अती वेगात वाहने चालवतात का? यावर किती पालक लक्ष ठेवतात? मुलांनी नियमभंग केला तर त्याला योग्य ती सूचना करतात? नियम पाळले नाही तर वाहन चालवू देणार नाही असा दम किती पालक देतात आणि तो अमलात आणतात? अनेकदा निर्दोष माणसांचे बळी घेणाऱ्या रस्ते अपघाताच्या प्रश्नाचा बहुआयामी विचार व्हायला हवा. जबाबाबदार नागरिकांनी देखील त्यावर उपाय सुचवायला हवेत. कारण रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवायलाच हवे. ती जबाबदारी संबंधित सगळे पार पाडतील अशी अपेक्षा लोकांनी करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या