दुबई | Dubai
आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women’s team) अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ७२ धावांनी धुव्वा उडवत आठव्यांदा आशिया चषकावर (Asia Cup) आपले नाव कोरले. आशिया चषकाच्या इतिहासात आठ वेळा हे विजेतेपद पटकावणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर मैदानावर एका मोठ्या नाट्यमय घडामोडीची नोंद झाली.
विजेतेपद सोहळ्यात मोठा ड्रामा
सामना संपल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजेतेपद सोहळ्यात (Post-Match Presentation) भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
भारतीय खेळाडू मैदानात न आल्याने नक्वी यांना तब्बल ४० मिनिटे वाट पाहावी लागली. अखेर निराश होऊन त्यांना मैदान सोडावे लागले. यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित भारतीय चाहत्यांनी ‘ट्रॉफी चोर’च्या घोषणा दिल्या. या घटनेचा आणि नक्वी घाईघाईने स्टेडियममधून गाडीने निघून जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने १८३ धावांचा डोंगर उभारला. यात शेफाली वर्माची ६९ धावांची तुफानी खेळी आणि स्मृती मंधानाचे ५९ धावांचे महत्त्वपूर्ण अर्धशतक निर्णायक ठरले. यानंतर १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण डाव १११ धावांतच आटोपला.भारताकडून दीप्ती शर्माने ४ बळी मिळवले, तर श्री चरणीने ३ फलंदाजांना तंबूत पाठवत श्रीलंकेच्या फलंदाजीची कंबर मोडली.




