मुंबई | Mumbai
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक (ICC T 20 World Cup) २०२६ चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट विश्वाचे लक्ष मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे યુવા स्टेडियमकडे लागले आहे. गुरुवारी, ५ मार्च रोजी दुसऱ्या उपात्य सामन्यात यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात निकराची लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.०० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
भारतीय संघाचे नेतृत्व आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत असून, घरच्या मैदानावर भारताला फायनलमध्ये नेण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असेल. दुसरीकडे, इंग्लंडने हॅरी ब्रूकच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. विशेष म्हणजे, भारताने (India) सहाव्यांदा तर इंग्लंडने पाचव्यांदा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ आहे. २०२२ मध्ये अॅडिलेडमध्ये इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. २०२४ मध्ये गयाना येथे भारताने ६८ धावांनी विजय मिळवून त्या पराभवाचा वचपा काढला होता. आता २०२६ मध्ये वानखेडेवर विजेता कोण? याचा फैसला होईल. साखळी फेरीत नेपाळ, स्कॉटलंड आणि इटलीला हरवून इंग्लंडने दिमाखात सुरुवात केली.
दरम्यान, सुपर-८ मध्ये श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांना धूळ चारून त्यांनी अव्वल स्थान गाठले. नामिबिया, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि अमेरिकेविरुद्ध सलग ४ विजय मिळवत भारताने विजयी सलामी दिली होती. सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असला, तरी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेवर मात करून भारताने उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले. वानखेडेवर या दोन संघांमध्ये आतापर्यंत ५ सामने झाले असून, भारताने ३-२ अशी निसटती आघाडी घेतली आहे.
बटलर विराटचा विक्रम मोडणार?
या सामन्यात सर्वांच्या नजरा इंग्लंडच्या जॉस बटलरवर असतील. बटलरला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी केवळ ५ धावांची गरज आहे. विराटने २१ डावात ६४८ धावा केल्या आहेत, तर बटलर २७सामन्यात ६४४ धावांसह त्याच्या अगदी जवळ आहे.




