नवी दिल्ली | New Delhi
क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी आणि रोमांचक असणारी ‘इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज (रविवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक नवा इतिहास रचला जाणार आहे. या महाअंतिम सामन्यात स्थानिक संघ गुजरात टायटन्स आणि फॉर्मात असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Gujarat Titans and Royal Challengers Bangalore) यांच्यात विजेतेपदासाठी ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळणार आहे. यंदाच्या संपूर्ण हंगामात हे दोन्ही बलाढ्य संघ तब्बल चौथ्यांदा एकमेकांसोबत भिडणार असून, या ‘हाय-व्होल्टेज सामन्यासाठी क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघांचे युवा आणि आक्रमक नेतृत्व. अष्टपैलू आणि संयमी खेळीसाठी प्रसिद्ध असलेला शुभमन गिल (Shubhman Gill) गुजरातच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर चाहत्यांचा अफाट पाठिंब्यासह विजेतेपद पटकावण्याचा त्याचा निर्धार असेल. दुसरीकडे आपल्या स्फोटक फलंदाजीने विरोधी संघांना धूळ चारणारा रजत पाटीदार (Rajat Patidar) बंगळुरूचे नेतृत्व करत आहे. त्याच्यावर आरसीबीला सलग दुसऱ्यांदा विजेता बनविण्याचे मोठे आव्हान असेल.
लक्षवेधी ठरणार ‘या’ खेळाडूंची कामगिरी
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, मात्र सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांनाही येथे मदत मिळते. अशा स्थितीत आरसीबीची आक्रमक फलंदाजी आणि गुजरातची संतुलित गोलंदाजी यांच्यातील ‘पॉवरप्ले’चा खेळ या सामन्याचा नूर ठरू शकतो. आज संध्याकाळी रंगणाऱ्या या महासंग्रामात रजत पाटीदार आरसीबीचे ‘कप’ राखणार की शुभमन गिल अहमदाबादमध्ये ‘टायटन्स’चे राज्य परत आणणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
४ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी गुजरात सज्ज
दुसरीकडे, दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवून गुजरात टायटन्सचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. २०२२ मध्ये पदार्पणातच विजेतेपद मिळविल्यानंतर तब्बल ४ वर्षांनी पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरण्यासाठी शुभमन गिलची ‘टायटन्स’ सेना सज्ज झाली आहे.
आरसीबीचा सलग दुसऱ्या किताबावर डोळा
गेल्या हंगामात विजेतेपद पटकावल्यानंतर यंदा सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी आपल्या नावावर करून आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसारखे ‘बॅक-टू-बँक’ विजेतेपद मिळविणाऱ्या यशस्वी संघांच्या क्लबमध्ये सामील होण्याची आरसीबीला सुवर्णसंधी आहे.
कोणाचे पारडे जड ?
- अहमदाबादच्या खेळपट्टीवर आणि आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांचे रेकॉर्ड पाहिले तर सामना अत्यंत चुरशीचा होईल यात शंका नाही.
- बंगळुरू : आमनेसामने सामन्यात पाच वेळा विजय मिळवला. अहमदाबाद मैदानावर एक विजय मिळवला. तर अंतिम फेरीत पाच वेळा प्रवेश केला.
- गुजरात : धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात बंगळुरूने गुजरातचा ९२ धावांनी मोठा पराभव केला होता. त्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी गुजरातचा संघ सज्ज असेल.




