मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा व्यवहार पूर्ण झाला असून राजस्थान रॉयल्स संघाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अमेरिकन व्यावसायिक कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील संघाने राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) १०० टक्के भागीदारी तब्बल १.६३ बिलियन अमेरिकन डॉलर्स (सुमारे १५,२८६ कोटी रुपये) मध्ये विकत घेतली आहे. या व्यवहारामुळे राजस्थान रॉयल्स आता आयपीएलमधील सर्वात महागडा संघ ठरला आहे.

मालकी हक्क बदलण्यासोबतच राजस्थान रॉयल्सच्या संघात मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व युवा तुफान रियान पराग करणार आहे. संघाचा जुना कर्णधार संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) सामील झाला आहे. सॅमसनच्या ट्रेड डीलमुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आता राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत दिसणार आहे. तर स्टार ऑलराउंडर सॅम करन दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर झाला आहे.
दरम्यान, २००८ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाची मूळ किंमत ६७ दशलक्ष डॉलर होती. दुसरीकडे आरसीबीचा (RCB) व्यवहार १५ हजार कोटींच्या पार गेल्यामुळे आता मार्केटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या विक्रीच्या चर्चांना उधाण आले आहे. तज्ज्ञांच्या मते, आरसीबीची ब्रँड व्हॅल्यू पाहता या संघाची किंमत २ बिलियन डॉलर्स (सुमारे १७ हजार कोटी) सहज ओलांडू शकते.
कोण आहेत कल सोमानी?
कल सोमानी हे अमेरिकेतील अॅरिझोना येथे स्थायिक असलेले दिग्गज उद्योजक आहेत. एड-टेक, आर्टिफि शियल इंटेलिजन्स आणि स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत. इन्ट्राएज्, अकॅडेमियन आणि टूयो. एआंय यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे ते मालक आहेत. मोटर सिटी गोल्फ क्लबचे सह-मालक आणि स्पोर्ट्समध्येही त्यांची मोठी गुंतवणूक आहे. त्यांना जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या वॉलमार्ट फॅमिलीचे रॉब वॉल्टन आणि फोर्ड मोटर कंपनीशी संबंधित शीला फोर्ड हॅम्प यांचा पाठिंबा आहे.




