
नवी दिल्ली | New Delhi
जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप २०२६ (FIFA World Cup 2026) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अमेरिकेतील न्यू जसीं येथील भव्य मेटलाइफ स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री १२:३० वाजता हा सामना सुरू होईल. फुटबॉल जगतातील दोन बलाढ्य संघ गतविजेता अर्जेंटिना आणि युरोपियन चॅम्पियन स्पेन (Spain and Argentina) सुवर्ण चषकावर नाव कोरण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.
या अंतिम सामन्याला (Final Match) युग बदलाचा सामना म्हटले जात आहे. एका बाजूला फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट लिओनेल मेस्सी आहे, जो कदाचित आपला शेवटचा विश्वचषक खेळत आहे. या स्पर्धेत तब्बल ८ गोल करत मेस्सीने अर्जेंटिनाला फायनलमध्ये पोहोचवले आहे. तर दुसऱ्या बाजूला, बार्सिलोनाचाच अवघ्या १६ वर्षांचा तरुण सनसनाटी खेळाडू लामिन यमाल स्पेनचे नेतृत्व करत आहे. लामिनने आपल्या वेगवान खेळाने आणि गोल करण्याच्या कौशल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे मेस्सीचा अनुभव की यमालचा उत्साह, यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
अमेरिकन स्टाईल हाफ-टाइम शो आणि विशेष रिंग्ज
फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदाच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या सुपर बाऊलच्या धर्तीवर एक भव्य हाफ टाइम शो आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जगप्रसिद्ध पॉप स्टार शकीरा आणि कोल्डप्ले बँड परफॉर्म करणार आहेत. तसेच, यंदाच्या विजेत्या संघाला ट्रॉफीसोबतच अमेरिकन क्रीडा संस्कृतीप्रमाणे विशेष चॅम्पियनशिप रिंग्ज देऊन सन्मानित केले जाणार आहे.
मी नाही, माझे सहकारी हिरो व्हावेत – मार्टिनेझ
मला हेडलाईन्समध्ये यायचे नाही, तर माझ्या सहकाऱ्यांनी सामन्याचे स्टार व्हावे अशी माझी इच्छा आहे, असे अर्जेंटिनाचा स्टार गोलकीपर एमिलियानो मार्टिनेझने सांगितले. मे महिन्यात हाताचे बोट फ्रैक्चर झाले असतानाही मार्टिनेझ शस्त्रक्रिया टाळून, वेदना सहन करत या स्पर्धेत खेळत आहे. २०२२ च्या विश्वचषक विजयाचा अनुभव पाठीशी असल्याने दबाव हाताळणे सोपे जात असल्याचे तो म्हणाला. स्पेनबद्दल बोलताना तो म्हणाला, स्पेनकडे फक्त लामिन यमाल नाही, तर अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. हा सामना फुटबॉल इतिहासात अजरामर होईल अशी मला आशा आहे.
लामिन यमाल सज्ज
अर्जेटिनाविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी स्पेनचा स्टार फॉरवर्ड लामिन यमाल पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो फायनलमध्ये खेळणार असल्याचे मुख्य प्रशिक्षक लुइस दे ला फुएन्ते यांनी स्पष्ट केले आहे. सेमीफायनलमध्ये फ्रान्सविरुद्ध झालेल्या दुखापतीमुळे यमालच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते, मात्र आता तो संघात परतला आहे. सामन्याविषयी बोलताना फुएन्ते म्हणाले, हा दोन सर्वोत्तम संघांमधील ऐतिहासिक सामना असेल. तसेच अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीला रोखण्यासाठी कोणतीही मॅन-टू-मॅन मार्किंग (विशेष फिल्डिंग) करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आपला जुना अनुभव सांगत ते म्हणाले, मी पूर्वी मेस्सीसाठी विशेष खेळाडू ठेवला होता, तरीही त्याने १५ मिनिटांत ४ गोल केले होते. त्यामुळे आम्ही सांघिक खेळावर भर देऊ. यमालने मेस्सीची नक्कल न करता स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळावा.
पैशांचा पाऊस
फिफा वर्ल्डकप २०२६ इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. ४८ संघ आणि १०४ सामन्यांच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेत यंदा विक्रमी ६५५ दशलक्ष डॉलर्सचा (अंदाजे ५,५०० कोटी रुपये) बक्षीस निधी ठेवण्यात आला आहे, जो २०२२ च्या तुलनेत ५० टक्क्यांनी जास्त आहे. स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला तब्बल ५० दशलक्ष (सुमारे ४२० कोटी रुपये) मिळतील, तर उपविजेत्या संघाला ३३ दशलक्ष मिळतील. हे बक्षीस थेट त्या देशाच्या फुटबॉल असोसिएशनला दिले जाते. रोख रकमेव्यतिरिक्त विजेत्यांना सुवर्णपदक, प्रतिष्ठित ट्रॉफी आणि पहिल्यांदाच विशेष चॅम्पियनशिप रिंग्ज देऊन गौरवले जाईल.
स्पेनचा दबदबा
स्पेनने सेमीफायनलमध्ये मजबूत फ्रान्सचा २-असा पराभव करत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. स्पेनचा वेगवान टिकी-टाका खेळ थांबवणे यंदा कोणत्याही संघाला जमलेले नाही. स्पेन २०१० नंतर पहिल्यांदाच विजेतेपदाच्या जवळ पोहोचला आहे.
अर्जेंटिनाचा पलटवार
गतविजेत्या अर्जेंटिनाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा २-१ असा पराभव केला. लिओनेल मेस्सी आणि ज्युलियन अल्वारेझ यांच्या जोडीने अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा आणि इतिहासातील चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी मिळवून दिली आहे.




