Wednesday, October 28, 2026
Homeमुख्य बातम्याMLC Election 2026 : नागपूरात मतपत्रिकांवरून आक्षेप, अमरावतीत 'जुनी पेन्शन'चा मजकूर; पुणे...

MLC Election 2026 : नागपूरात मतपत्रिकांवरून आक्षेप, अमरावतीत ‘जुनी पेन्शन’चा मजकूर; पुणे अन् मराठवाड्यात अटीतटीची लढत, कुठल्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस (Vote Counting) सुरुवात झाली आहे. टपाली मतांच्या मोजणीनंतर आता पोस्टल मतांच्या (Vote Counting) मोजणीला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत नागपूर, पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान सध्या मतमोजणी वेगाने सुरू असून, पहिल्याच फेरीपासून विविध केंद्रांवर राजकीय चुरस, आक्षेप आणि नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. नागपूर, पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथे मतमोजणीवेळी अत्यंत रंजक आणि वादग्रस्त प्रसंग पाहायला मिळत आहेत.

नागपूर पदवीधरमध्ये कोहळे-वंजारींमध्ये चुरस

नागपूरमध्ये ८४ टेबलवर मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या २० टेबलवर भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. मात्र, मतमोजणीदरम्यान ८ मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पहिल्या पसंतीत निकाल न लागता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागेल, असा दावा कराळे यांनी केला. दुसरीकडे, मतदान कर्मचारी अवैध मते ग्राह्य धरत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. येथे भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यात काटोकाटीची लढत सुरू असून नितेश कराळे तिसऱ्या क्रमांकावर मते घेत आहेत. नागपूर विभागात कुल १,६५,९०९ मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे.

हे देखील वाचा : MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणीला सुरुवात; मतपेट्यांचे सील अन् पोलिसांच्या भूमिकेवरून विविध केंद्रांवर गोंधळ

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेसेनेचा उमेदवार आघाडीवर

अमरावतीमध्ये १४ टेबलवर मतमोजणी सुरू असून एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अनेक शिक्षक मतदारांनी मतपत्रिकेवर पसंतीक्रमाऐवजी ‘जुनी पेन्शन योजना’ असा मजकूर लिहिल्याचे उघडकीस आले आहे. असा मजकूर लिहिलेल्या मतपत्रिका नियमानुसार बाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या फेरीतील १४ हजार मतांपैकी १० हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये महायुती (शिंदे गट) समर्थित किरण सरनाईक हे १५०० मतांची आघाडी घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिंदे गटाचे बंडखोर माजी आमदार श्रीकांत देशपांडे असून महाविकास आघाडीच्या (काँग्रेस) उमेदवार आदिती पोहरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघात कोण आघाडीवर?

पुण्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मोजणीसाठी १०० टेबल मांडण्यात आले आहेत. ५०-५० च्या संचात वैध आणि अवैध मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीचे (शिंदे गट) सचिन सानप थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल्याचे चित्र आहे. येथे भाजपचे कौस्तुभ गावडे आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्यात सामना होत असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या स्थानावर आहेत. तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख पिछाडीवर आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती-मविआत अटीतटीची लढाई

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात एकूण ५१५ टपाली (पोस्टल) मतांपैकी २१ मते बाद झाली असून ४९४ मते वैध ठरली आहेत. टपाली मतांच्या मोजणीत महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ६७ मते तर महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ६४ मते मिळाली आहेत. सतीश चव्हाण यांनी टपाली मतदानात ३ मतांची आघाडी घेतली आहे. याठिकाणी प्रत्यक्ष मतमोजणीवेळीच खरी लढाई दिसून येणार आहे. दरम्यान सर्वच मतदारसंघांमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांचे वर्गीकरण आणि मोजणी पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

नागपूर पदवीधर निवडणुकीत मोठा उलटफेर; काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयाच्या उंबरठ्यावर; अधिकृत...

0
नागपूर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत असून,...