शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा सत्रन्यायालयाने दिलेला दणका आणि चंद्रपूरमधील शेतकरी छळाची घटना यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाने दिलेला निकाल मान्य करावाच लागतो, न्यायालयीन लढाई सुरूच असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सायंकाळी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सदनिका गैरव्यवहार प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षे कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला कोकाटे यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली आहे.
यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आज जो निकाल आला आहे, तो मान्य करूनच पुढे जावे लागेल. कोकाटे यांना आता उच्च न्यायालयात दाद मागण्याची संधी उपलब्ध आहे. काँग्रेस काळातील राजीनाम्यांच्या संदर्भावर भाष्य करताना ते म्हणाले, नियम सर्वांना सारखाच असतो. शिक्षेला स्थगिती मिळाल्यास पुढील कारवाई थांबते. सध्याच्या प्रकरणात न्यायालयाची नेमकी भूमिका काय आहे, हे तपासावे लागेल. पुढील कायदेशीर प्रक्रियेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.
सावकारावर कडक कारवाई
चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर येथे सावकाराने कर्जासाठी एका शेतकर्याला किडनी विकण्यास भाग पाडल्याच्या घटनेवर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने याची दखल घेतली असून संबंधित सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकार पूर्णपणे शेतकर्याच्या पाठीशी असून त्याला न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी विश्वस्त सचिन तांबे, अशोक पवार यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




