दिल्ली | Delhi
AIIMS ने ऑटोप्सी, व्हिसेराचा फॉरेन्सिक अहवाल सीबीआयकडे सोपवला आहे. सुशांतची हत्या की आत्महत्या लवकरच उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. AIIMS रुग्णालयाने सुशांत मृत्यूप्रकरणातला आपला ऑटोप्सी आणि व्हिसेराचा फॉरेन्सिक अहवाल CBI च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. या AIIMS च्या अहवालात सुशांतच्या व्हिसेरात विषाचे कोणतेही अंश आढळले नसल्याचं म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू १४ जून रोजी झाला होता आणि त्याचे शवविच्छेदन त्याच दिवशी मुंबईतील कूपर रुग्णालयात झाला होता. नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर एम्सच्या डॉक्टरांच्या एका पथकाला या अहवालाची तपासणी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. काल संध्याकाळी एम्सकडून हा अहवाल सीबीआयला देण्यात आला. एम्सच्या या अहवालात विषप्रयोगाची शक्यता नाकारण्यात आली आहे, पण हत्येच्या संशयाला मात्र नकार देण्यात आलेला नाही. असे मानले जात आहे की सीबीआय आता या अहवालाच्या आधारावर आपला तपास करणार आहे.
काही दिवसांपूर्वी सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांच्या वकिलांनी सीबीआयवर आरोप केला होता. सुशांतची गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि सीबीआयकडून चौकशीत दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप वकिलांनी केला होता. यावर सीबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. अद्याप कोणत्याही गोष्टीचा इन्कार करण्यात आलेला नाही, असं सीबीआयनं निवेदन जारी करत म्हटलं आहे.
‘सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाची सीबीआय पूर्ण व्यावसायिक दृष्टीने चौकशी करत आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक बाबींकडे पाहिलं जात आहे आणि कोणत्याही गोष्टीचा इन्कार करण्यात आलेला नाही. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.’, असं सीबीआयनं स्पष्ट केलं आहे.