Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्याएसटीचा संप मागे; मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ

एसटीचा संप मागे; मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

एसटी कर्मचार्‍यांनी अखेर त्यांचा संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचार्‍याची बैठक काल पार पडली. या बैठकीत कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यात विशेष म्हणजे एसटी कर्मचार्‍यांनी 5000 रुपयांची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल 6500 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे काल महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एसटी कर्मचार्‍यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? याकडे राज्याचं लक्ष होतं. अखेर एकनाथ शिंदे यांना याबाबत मोठं यश आलं आहे.

नेमकी पगारवाढ कशी झाली ?
ज्यांना 5 हजार रुपयांची वाढ 2021 झाली होती, त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 2021 ला ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली. ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात 4 हजार रुपयांची भरघोस वाढ सरकारने केली आहे. तसेच दोन वर्षांपासून जे कर्मचारी निलंबित आहेत. त्यांना पुन्हा कामावर घेणार आहेत. मी या निमित्त राज्य सरकारचा महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांच्या वतीने आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली. तसेच पडळकर यांनी सर्व एसटी कर्मचार्‍यांना गुरूवारी सकाळी सात वाजेपासून कामावर जाण्याचं आवाहन केलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या