Sunday, May 19, 2024
Homeनगरस्टॅम्प पेपर सहा महिन्यांत होणार बंद - खा. डॉ. विखे

स्टॅम्प पेपर सहा महिन्यांत होणार बंद – खा. डॉ. विखे

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

गोरगरिबांच्या जमिनी लाटून मागील काळात झालेल्या लूटमारीला आता हे सरकार चाप लावणार असून पुढील सहा महिन्यांत स्टॅम्प पेपर हे पूर्ण बंद करण्याचा निर्णय राज्यातले महायुतीचे सरकार घेणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी येथे सांगितले.

- Advertisement -

श्रीगोंदा शहर येथील संत श्री शेख महाराज मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भुमिपूजन व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन वास्तूचा उदघाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार राम शिंदे व विक्रमसिंह पाचपुते यांची भाषणे झाली. याप्रसंगी आ.बबनराव पाचपुते, आ. बाबासाहेब भोस, प्रताप पाचपुते, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगरध्यक्ष ज्योती खेडकर, केशव मगर, बाळासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले की, स्टॅम्प पेपरद्वारे असे लुटीचे प्रकार राज्यात कुठेही होऊ नये याकरिता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टॅम्प पेपर हे बंद करून त्याऐवजी आता फ्रँकिंग सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही निर्णय घेताना सुरुवातीस थोडा त्रास होतो मात्र याचे दूरगामी चांगले परिणाम दिसतात. वाळूचा असाच ऐतिहासीक निर्णय घेतला. काही दिवस याचा त्रास होईल परंतु यातून वाढणारी गुन्हेगारी ही संपूर्णपणे थांबेल, असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार याच्या नेतृत्वाखाली सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात आ.पाचपुते यांनी शंभर कोटी रुपयांचे विकास कामे आणली. माविआ सरकारच्या काळात एक फुटकी कवडी त्यावेळच्या राज्यकर्त्यानी दिली नाही. आणि आज हेच लोक साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या बाबतीत तोंड वर करून विचारतात हे आश्चर्यकारक आहे.

याप्रसंगी भैय्या लगड, शहाजी हिरवे, बाळासाहेब गिरमकर, अनिल ढवाळ, मिलिंद दरेकर, बापू गोरे, पोपट खेतमाळीस तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

थोरात, नागवडे यांना टोला

राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता खा. विखे यांनी तालुक्यातील सात वर्षे महसूल मंत्री असताना तालुक्यातील कुठले प्रश्न मार्गी लावले आहेत का? असा प्रश्न करत त्यांना तालुक्यातील केवळ एकच नेता आणि त्यांचेच प्रश्न दिसले. मात्र आत्ताच्या सरकारने तालुक्यासाठी भरीव निधी दिला,असे म्हणत नागवडे आणि थोरात या दोघांना खासदार विखे यांनी टोला लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या