Wednesday, January 15, 2025
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : धगधगत्या समस्येवर भाष्य ’राजर्षी’

राज्य नाट्य स्पर्धा : धगधगत्या समस्येवर भाष्य ’राजर्षी’

संदीप जाधव | 9225320946

भारत स्वातंत्र्य होण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला. मात्र, तत्पूर्वी समाजात असलेला वर्णभेद, जातीभेद, मानसिक गुलामगिरी, शोषण, अत्याचार, रूढी-परंपरा यांच्या विळख्यात अडकलेल्या समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे काम समाजसुधारकांनी केले आहे. शाहू-फुले-आंबेडकर या त्रयींनी सामाजिक कार्यात झोकून समाज परिवर्तन घडविण्यासाठी मोठा संघर्ष केला. प्रचलित ब्राह्मणवादाशी दोन हात केले. सामाजिक विषमता कमी करण्यासाठी दुर्बलांना आरक्षण देण्याचा पाया राजर्षी शाहूमहाराज यांनी रचला. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा नाट्यप्रयोग सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेतील ‘राजर्षी’ या नाटकात पाहायला मिळाला.

- Advertisement -

संगमनेरच्या संगम ग्रामविकास मंडळाने सादर केलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी केले. देशाला आजही जातीवाद, धर्मवाद या धगधगत्या ज्वलंत समस्या भेडसावत आहेत. समस्यांमुळे हताश झालेल्या तरुणांना सत्यशोधक समाज, आरक्षण, जातीभेद या बाबत पडलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. डॉ. मुटकुळे यांची ही संहिता दमदार होती. काही पात्रांचा अभिनही उत्तम होता. काही प्रसंग जुळवून घेताना मात्र गडबड झाल्याचे दिसले. स्वाती व अब्दुल हे दोन भिन्न धर्मातील प्रेमी युगूल. त्यांचे प्रेम म्हणणे लव्ह जिहादचा प्रकार आहे असे काहींना वाटते. हे समजल्यावर पोलिस अधिकारी दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये आणतात. स्वाती-अब्दुल यांचे पालक स्वतःची मुले हरविल्याची फिर्याद स्टेशनमध्ये देऊन जातात. नंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्यांचे लग्न सत्यशोधक पद्धतीने लावण्याचे पोलिस अधिकारी ठरवतात.

मात्र, हे मान्य नसल्याने स्वाती-अब्दुल पोलिस अधिकार्‍यांना त्याबाबत विचारणा करतात. हे ऐकून अस्वस्थ झालेले पोलिस अधिकारी स्टेशनमधील असलेल्या महात्मा फुलेंच्या तसबिरीला आर्जव करतात. ते येतात आणि या तरुणांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. सत्यशोधन समाजाची निर्मिती, स्त्री शिक्षण, वर्णभेद, स्वातंत्र्य, समता, बंधूता आदी विषयांवर कार्य करताना कराव्या लागलेल्या संघर्षाची माहिती महात्मा फुले देतात व नंतर निघून जातात. नंतर स्वाती-अब्दुल व पोलिस अधिकारी, कॉन्स्टेबल यांच्या संवादातून आरक्षण विषयावर टीका केली जाते. नंतर आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आर्जव केले जाते. ते येतात. कोणत्या कारणामुळे आपण वंचित घटकांना आरक्षण दिले, याचा खुलासा करतात. सामाजिक अस्पृश्यता, आंतरजातीय विवाह कायदा, तलाठी पद्धत याबरोबरच अनेक कार्याची माहिती त्यांच्या प्रसंगांतून दिली जाते. नंतर जातीभेदाचा आणि घटनेचा विषय संदर्भ निघाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आर्जव करण्यात येते. तेही आपण घटना लिहिताना केलेला सामाजिक विचार, तसेच अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले विविध सत्याग्रह, संघर्ष याबाबत माहिती देतात व निघून जातात.

इकडे पोलिस स्टेशनमध्ये अब्दुलचे वडील मौलाना व स्वातीचे वडील पुरोहित बंदूक घेऊन हल्ला करतात. त्यात प्रथम पोलिस अधिकारी व कॉन्स्टेबल भोला मरण पावतात नंतर स्वाती-अब्दुल यांना संपवले जाते. शेवटी फुले-शाहू-आंबेडकर हे तिघेही एकत्र येतात. भारताच्या एकात्मतेसाठी या तिघांचेही विचार आजही प्रेरक आहेत, असा संदेश देऊन नाटक संपते.
नाटकाची संहिता डॉ. मुटकुळे यांनी चांगल्या प्रकारे लिहिली. सध्या देशाला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्येवर त्यांनी थेट भाष्य केले. दिग्दर्शनात काही चुका झाल्या. एक-दोन प्रसंगांत तर फेडआऊट न घेता केलेली नेपथ्याची मांडणी खटकली. तसेच अंधारात मांडणी करताना वापरलेल्या विजेर्‍या योग्य वाटल्या नाही. पोलिस अधिकारी कमालीचा भावूक दाखवला! त्यामुळे नाटकात विस्कळीतपणा आला. मात्र, कलाकारांनीही आपापल्या परीने भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

महात्मा फुलेंची भूमिका सूर्यकांत शिंदे यांनी केली. धीरगंभीर भाव त्यांना छान जमले. छत्रपती शाहू महाराजांची भूमिका दिनेश भाने यांनी केली. ही भूमिका पूर्ण नाटकात लक्षवेधी ठरली. लांबलचक संवादही त्यांनी संयमाने व आत्मविश्वासाने पूर्ण केले. अभिनयही उत्तम. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका नरेश बडेकर यांनी केली. त्यांच्या संवादात असलेला परखडपणा योग्य वाटला. पोलिस अधिकारी राजन झांबरे यांनी निभावला. त्यांचा आवाज अधिकार्‍याला शोभत होता पण देहबोलीत ते कमी पडले. अब्दुलला ज्ञानेश्वर वर्पे यांनी, तर स्वाती या पात्राला पुनम कदम यांनी रंगमंचावर आणले. त्यांचाही अभिनय चांगला वाटला. त्या दोघांनाही आपले पात्र आणखी फुलवता आले असते. पुरोहित व राजाराम शास्त्री हे पात्र प्रवीण घुले यांनी केले. मौलानाची भूमिका राजू अत्तार यांनी केली. भोला ही भूमिका बाबासाहेब मोकळ यांनी उत्तम केली. याशिवाय सबणीस (राजू अत्तार सर), रामशास्त्री (सुनील भांडगे), गंगाराम (रविंद्र पगार), सेवक (विठ्ठल शिंदे), छोटी तरुणी (शिवन्या कदम) यांनीही नाटकात भूमिका केली. दिग्दर्शक मुटकुळे यांनी नारायणभट ही भूमिका चोखपण पार पाडली.

प्रकाश योजना वसंत बंदावणे यांची होती. शेवटचा प्रसंग प्रकाश योजनेमुळे प्रभावी झाला. त्यांना या नाटकात खूप वाव होता. नेपथ्य ज्ञानेश्वर वर्पे, विठ्ठल शिंदे यांचे होते. राजवाडा, मंदीर, जंगल आदी स्थळ दर्शविण्यासाठी प्रतिमा समर्पक वाटल्या. मात्र, साहित्य हलविताना दोनदा खूपच गडबड झाली. पार्श्वसंगीत संतनू घुले व संगीत संयोजन रमेश पावसे यांचे होते. अनेक प्रसंग संगीतामुळे परिणामकारक झाले. काही वेळा संगीत अनावश्यक वाटले. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांची होती. अब्दुल, महात्मा फुले, छत्रपती शाहूमहाराज, डॉ. आंबेडकर, नारायणभट, पोलिस अधिकारी यांची रंगभूषा उत्तम होती. वेशभूषा वंदना जोशी-बंदावणे यांनी सांभाळली. तिघेही समाजसुधारक, तसेच रामशास्त्री यांची वेषभूषा चांगली. रंगमंच व्यवस्था राजू पवार यांनी पाहिली. देशाला सतावत असलेल्या धर्मवादाची नाळ थेट समाजसुधारकांच्या विचारांशी जुळविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला. काही अंशी ते यशस्वी झाले असले तरी स्पर्धेतील मापदंडानुसार ते काहीसे कमी पडल्याचे दिसले. प्रयत्न मात्र कौतुकास्पद.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या