संदीप जाधव | अहिल्यानगर
मुलांच्या भविष्यासाठी पालक कायम झटत असतात. मुलांचे शिक्षण, नोकरी, विवाह यासाठी कष्ट करतात. अनेकदा मुलांच्या चुकीच्या निर्णयाने ते दुखावतात. मात्र, आईवडिलांच्या मनःस्थितीचा विचार करणारी मुलंही समाजात विशेषतः ग्रामीण भागात जास्त आहेत. असाच एक तरुण स्वप्नपूर्तीसाठी पालकांचा विश्वासघात करण्यास तयार नसतो. त्याने घेतलेल्या ठाम भूमिकेचा शेवट कसा सकारात्मक होतो हे सांगणारी कथा राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी (24 नोव्हेंबर) ‘स्वप्नवाट’ या नाटकाने दाखवली. अगदी साधी, सरळ, सोपे कथानक असलेले, पण बरंच काही सकारात्मक सांगणारे हे नाटक सहजपणे प्रेक्षकांच्या मनी उतरले.
कोपरगावच्या संकल्पना फाउंडेशनने सादर केलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन डॉ. किरण लद्दे यांनी केले. गूढ, रहस्यमय, शहरी जीवन या विषयांवरील लिखाणात हातखंडा असणार्या डॉ. लद्दे यांनी प्रथमच ग्रामीण भागाशी संबंधित संहितेचे लिखाण केले. ग्रामीण भागातील विवाह समस्या, पालकांच्या अपेक्षा आणि तरुणाईतील महत्त्वाकांक्षेबरोबरच चांगुलपणा आदी मुद्द्यांना या नाटकाने हात घातला. त्यामुळे प्रत्येकाला ही कथा आपल्याजवळची वाटली. त्याचे श्रेय डॉ. लद्दे यांच्या दिग्दर्शनाला द्यावे लागेल. कलाकारांनीही भूमिकेत जीव ओतण्याचा चांगला प्रयत्न केला.
पहिल्याच प्रसंगात सकाळी घरासमोरील सडा-रांगोळी करत असलेली तरुणी, गाणं म्हणत आलेला वासुदेव यामुळे नाटक ग्रामीण जीवनाशी निगडित असल्याचे स्पष्ट होते. गावातील तीन घरांचे प्रातिनिधिक स्वरूप यात दाखविले आहे. सखाराम-रखमा या दाम्पत्याला तिशीतील मुलगा (मोहन) असतो. दुसर्या घरातील तात्या व त्यांचा मुलगा गोलू, तर तिसर्या घरातील आप्पा व त्याची तरुण मुलगी वृंदा या आठ पात्रांना घेऊन नाटक पुढे पुढे सरकत जाते. गावात शेती करत असलेल्या मोहनचा विवाह होत नसतो. त्यामुळे त्याला शहरात कामासाठी जायचे असते. मात्र, सखाराम व रखमा यांचा त्यास स्पष्ट विरोध. दुसरीकडे वृंदालाही उच्चशिक्षणासाठी शहरात जायचे असते. मात्र त्याला आप्पांचा विरोध असतो. तिने प्रथम विवाह करावा अशी अप्पाची इच्छा असते. कल्पना-मोहनचे नेहमीच खटके उडत असतात. अशातच सखाराम आपल्या मुलासाठी वृंदाचा हात अप्पाकडे मागतो.
मात्र या विवाहाला तो स्पष्ट नकार देतो. वृंदाला तिच्या पसंतीने विवाह करेन हे वचन त्याने पत्नीला तिच्या मृत्यूपूर्वी दिलेले असते. मोहनची नाजूक आर्थिक स्थितीवरही तो बोट ठेवतो. हे सर्व वृंदा चोरून ऐकते. मग तिच्या मनात भन्नाट कल्पना येते. मोहनला विवाह होण्यासाठी शहरात नोकरीला जायचे असते आणि वृंदाला शिक्षणासाठी! शहरात जाण्यासाठी आपण खोटा विवाह करू आणि नंतर ‘आपले पटत नाही’ ही सबब देऊन सोडचिठ्ठी घेऊ असं वृंदा सांगते. या प्रस्तावास मोहन कसाबसा होकार देतो. विवाहाची तयारी सुरू होते. विवाहाच्या खर्चासाठी सखाराम आपली जनावरे विकतो, तर आप्पा आपली जमीन गहाण ठेवतो. विवाह होणार असल्याने सर्वजण आनंदात असतात.
ठरल्यानुसार दोघांचा थाटामाटात विवाह होतो आणि ते दोघेही शहराकडे रवाना होतात. दोन वर्षांनी घरी येऊन एकमेकांवर तोंडसूख घेतात. मग दोन्ही कुटुंबात भांडणं होतात, असे स्वप्न मोहनला पडते. मग भानावर आल्यानंतर खोटे-खोटे लग्न करण्याला नकार देतो. आई-वडिलांच्या अपेक्षा, त्यांचा त्याग, भावनांचा विचार करून वृंदाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. मोहनच्या या विचारांनी प्रभावित होऊन शेवटी वृंदा खोटे-खोटे नाही तर खरे-खरे लग्न करायला तयार होते. अशा सकारात्मक, समाधानी प्रसंगाने नाटकाचा शेवट होतो. दरम्यानच्या काळात तात्या व गोलू यांचेही प्रसंग नाटकात येतात. अनेकदा ते विनोदांची खसखस पिकवतात.
ग्रामीण भागातील विवाह समस्येवर बोट ठेवून पालकांप्रती असलेल्या विश्वासाची भावना यांची सांगड घालत लिहिलेल्या या नाटकाला डॉ. किरण लद्दे यांनी रंगमंचावर सहजपणे उतरवले. कुठलीही क्लिष्टता, गुंतागुंत नाटकात नव्हती. कलाकारांनी आपापल्या भूमिकेत जीव ओतल्याचे दिसले. सखाराम हे पात्र गणेश सपकाळ यांनी रंगमंचावर आणले. अस्सल गावरान भाषा आणि भावूक प्रसंगांत करुण हावभाव त्यांनी उत्कृष्टपणे दर्शविले. रडण्याचा अभिनयही कमालीचा नैसर्गिक होता. आपली भूमिका त्यांनी आत्मविश्वासाने पार पाडली. रखमा हे पात्र गायत्री कुलकर्णी यांनी वठवले. अभिनयही उत्तम. विविध प्रसंगांत मायाळू व प्रेमळपणा त्यांनी उठावदारपणे दर्शविला. देहबोलीचीही चांगली साथ त्यांना मिळाली. मोहन हे पात्र प्रथमेश पिंगळे यांनी रंगवले. स्पर्धेमध्ये सादर होणार्या गेल्या पाच वर्षांतील नाटकात सलगपणे काम करणारे ते ‘संकल्पना’चे एकमेव कलावंत. यंदा त्यांचा अभिनय कमालीचा बहरल्याचे दिसले. चिंचातूर भाव रेखाटनाच विनोदही त्यांनी पिकवले.
मुलीच्या भविष्याची काळजी असणार्या आप्पाला डॉ. योगेश लाडे यांनी ठामपणे उभे केले. विविध प्रसंगांत त्यांच्या भावूक अभिनयाने टाळ्या घेतल्या. हावभावांकडे त्यांनी चांगले लक्ष दिले. हर्षा बनसोडे यांनी वृंदाची केलेली भूमिका भारीच वाटली. पदार्पणातच तिने रमरसतेने साकारलेली भूमिका चांगलीच बहरली. करुण, मिष्कील भाव तिच्या वाट्याला आले. आवाजातील चढ-उतारही तिला छान जमले. तात्या हे पात्र प्रा. गजानन पंडीत यांनी सांभाळले. त्यांचा अभिनय ठीक वाटला. गोलू हे पात्र प्रतीक गवळी याने केले. गुटगुटीत गोलूने आपले संवाद सहज पूर्ण केले. भविष्यात त्याला संधी मिळाल्यास तो आपली भूमिका आणखी उठावदार करू शकेल. वासुदेवाला राहुल वाकळे यांनी सकाळीच रंगमंचावर आणले. सकारात्मक देहबोलीच्या आधारे त्यांनी आपली भूमिका पार पाडली.
नेपथ्याची जबाबदारी गणेश सपकाळ, अमित तिरमखे यांनी सांभाळली. मातीची तीन घरे, घराबाहेरील भांडे ग्रामीण भागातील दृश्य दर्शवित होते. प्रकाश योजना डॉ. किरण लद्दे यांच्याकडे होती. प्रसंगानुरूप त्यांनी विविध स्पॉट दिले. सकाळी आलेली सूर्याची आलेली किरणे हुबेहूब वाटली. पार्श्वसंगीत डॉ. मयूर तिरमखे यांचे होते. गंभीर प्रसंगांत त्यांनी योग्य पार्श्वसंगीत दिले. तसेच न दिसणारी जनावरे आवाजाद्वारे डॉ. लद्दे यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आणली. रंगभूषा डॉ. आस्था तिरमखे यांनी केली. रखमा, आप्पा, सखाराम, वृंदा यांची रंगभूषा चांगली वाटली. वेशभूषा मोनिका सपकाळ यांची होती. अस्सल गावरान वाटणारी रखमा, सखाराम, तात्या, आप्पा, वृंदा या सर्वांचीच वेशभूषा प्रभावी वाटली. मात्र स्वप्नातील प्रसंग खटकला. मोहन-वृंदा घरातून जाताना व परत येताना त्यांच्या पायात चप्पल नव्हती, शिवाय मोहनच्या शर्टाची बटणं उघडीच होती!
नाटकाचे सादरीकरण करण्यासाठी पात्रांकडून चांगली तयारी डॉ. लद्दे यांनी करून घेतली. विवाहाचा प्रसंग छान जुळला. ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन, विवाह समस्या, शिक्षणाची महत्त्वाकांक्षा, आई-वडिलांप्रती असलेला आदर, विश्वासघाताला स्पष्ट विरोध आदी बाबींची ‘संकल्पना’ घेऊन दाखविलेली स्वप्नवाटेची किरणं प्रेक्षकांना समाधानी वाटलं, हे मात्र नक्की!





