Sunday, May 19, 2024
Homeनगरराज्यात मुलींच्या जन्मदराचा वेग कमीच; भविष्यात गंभीर परिणामाची शक्यता

राज्यात मुलींच्या जन्मदराचा वेग कमीच; भविष्यात गंभीर परिणामाची शक्यता

संगमनेर | Sangamner

राज्यामध्ये गेले काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्त्रीभ्रूणहत्या होत असल्याच्या अनेक बाबी उघड झाल्या आहेत. यासंदर्भात कायदे करूनही आणि गुन्हे दाखल करूनही मोठ्या प्रमाणात घट होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर वेगाने उंचावत नसल्याचे हे चित्र आहे.

- Advertisement -

2021 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर हे सात ने कमी झाले आहे. 2020 मध्ये महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर 906 इतके होते हेच प्रमाण 2021 मध्ये 913 इतके झाले आहे. राज्यामध्ये सतरा जिल्ह्यांतील मुलींचे प्रमाण 2020 पेक्षा काही प्रमाणात अधिक असल्याची बाब समोर आली आहे. उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचेही समोर आले आहे. वर्धा व गडचिरोलीमध्ये दर हजारी मुलींच्या प्रमाणात 32 ने वाढ झाली आहे ही समाधानाची बाब आहे.

राज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण 865 इतके असून ते सर्वात कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे प्रमाण 951 इतके असून ते सर्वाधिक मानले गेले आहे.

या जिल्ह्यात मुलींचे प्रमाण वाढले

आपल्या राज्यात ठाणे पाच, पालघर शून्य, धुळे तीन, जळगाव सात, अहमदनगर दोन, सोलापूर एक, जालना 19, गडचिरोली 32, चंद्रपूर 25, गोंदिया सहा, भंडारा 32, नागपूर 13, यवतमाळ 24, उस्मानाबाद 14, नांदेड एक अमरावती, बीड, पालघर शून्य अशा प्रकारची वाढ 2021 मध्ये झालेली दिसते. 2020 पेक्षा 21 मध्ये मुलींच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झालेले जिल्हे लक्षात घेतले तर वाशिम मध्ये 101, रत्नागिरी 48, औरंगाबाद 37, सातारा 36, पुणे 13, नंदुरबार 26 इतकी संख्येने एका वर्षात घट झाल्याचे दिसते आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक मानली जाते.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर प्रमाण लक्षात घेतले असता लिंग गुणोत्तराचे प्रमाण 865 इतके असून ते सर्वात कमी आहे. ठाणे 920, पुणे 911, अहमदनगर 886, पालघर 938, सिंधुदुर्ग 951 व ठाणे 920 असे साधारण चित्र आहे. 900 पेक्षा अधिक गुणोत्तर असल्याचे प्रमाण 20 जिल्ह्यांमध्ये असून उर्वरीत जिल्ह्यांमध्ये मात्र 900 पेक्षा कमी गुणोत्तर असल्याचे चित्र आहे.

सोनोग्राफी केंद्रात वाढ

महाराष्ट्र शासनाने प्रसूतीपूर्व निदान तंत्रे प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्व लिंग चाचण्यांवरती प्रतिबंध केला आहे. 2022 पर्यंत महाराष्ट्रात दहा हजार 372 सोनोग्राफी केंद्रांना मान्यता देण्यात आलेली होती. कायद्याची भूमिका कडक करूनही राज्यांमध्ये मात्र मुलींच्या जन्मदरामध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही.

दलालीचा व्यवसाय जोरात

राज्यामध्ये मुलांपेक्षा मुलींच्या संख्येत घट होत असल्याने मुलांना विवाहासाठी वधू मिळत नाहीत. याचा फायदा उठवत राज्यातील काही लोकांनी मोठ्या प्रमाणावर लाच देऊन मुलगी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही ठिकाणी तर एकाच मुलीचा अनेकांबरोबर विवाह लावून मोठ्या प्रमाणावर आर्थिक संपत्ती लुटण्याचा एक प्रयत्न झाला. लग्नासाठी मुली मिळून देतो असे सांगून मुलाकडील लोकांना हजारो रुपयांना फसवणारे महाभाग समाज व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत. मुलींचा जन्मदर उंचावण्यासाठीचे प्रयत्न न झाल्यास भविष्यात आणखी गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागण्याचे अभ्यासक सांगतात.

लग्नासाठी मुली देता का मुली..

राज्यातील मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणावर घसरत असल्याचे चित्र समोर असताना, सोलापूर जिल्ह्यामध्ये लग्नासाठी मुले तयार आहेत पण मुली मिळत नाही म्हणून तेथील वरांनी मुली मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता. राज्यात सर्व दूर अशीच अवस्था आहे. येत्या काही वर्षात यातून सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजही ग्रामीण भागात शेकडो तरुण विवाहाचे वय उलटून गेल्यानंतर देखील वधू मिळावी या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहेत. यातून अनेक मुलांची 40 पार झाली आहे. लग्नासाठी वधू मिळत नसल्याने ती कुटुंबे चिंताक्रांत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या