Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'इतक्या' हजार कोटींच्या...

CM Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘इतक्या’ हजार कोटींच्या आर्थिक पॅकेजची केली घोषणा

मुंबई | Mumbai
सप्टेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला आहे. शेतकऱ्यांची जमीन अक्षरशः खरडून निघाली आहे. अशा स्थितीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली असून आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा सरकारने केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केली आहे. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी ३.४७ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील ६८ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. २९ जिल्हे आणि २५३ तालुके सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले आहेत. जिथे पिकांचे नुकसान झाले तिथे अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींची मदत जाहीर केली आहे.

YouTube video player

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, घरांची पडझड झाली, तिथे घरे उभारली जातील, ५० हजार रूपयांची मदत दुकानदारांना करणार आहेत. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जनावरांची अट रद्द केली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाईल. खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत. ज्या विहिरींमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून ३० हजार रूपये प्रति विहीर भरपाई दिले जाणार आहे. पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे १० हजार कोटी मदत केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच ६१७५ कोटी रूपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहोत. बियाणे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल. कोरडवाहू शेतकऱ्यांना १८ हजार ५०० रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना २७ हजार प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० हेक्टर मदत दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना १७ हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने ३१ हजार ६२८ कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून दिले आहे. जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“एकूण सर्व प्रकारची मदत आपण करत आहोत. खरडून गेलेली जमीन, शेती पिकांचं नुकसान, मृत जणावरांबाबत मदत असेल, जखमी झालेल्या व्यक्तींना मदत असेल, तसेच आपण तात्काळ १० हजार रुपये देत आहोत, ती मदत असेल किंवा यामध्ये ज्या घरांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे, त्या घरांसाठी आता आपण नव्याने घरे बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपण ती घरे बांधणार आहोत. डोंगरी भागातील ज्या घरांचं नुकसान झालं आहे, त्या घरांना आपण प्रत्येकी १० हजारांची जास्त मदत करत आहोत. तसेच शेतकऱ्यांच्या गोठ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांनाही आपण मदत करणार आहोत. ज्या दुकानदारांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यांनाही आपण मदत करत आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...