Thursday, May 2, 2024
Homeराजकीयकिरीट सोमय्या यांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांना निवेदन

किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांना निवेदन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

झेड दर्जाची सुरक्षा असूनही भारतीय जनता पक्षाचे( BJP ) माजी खासदार किरीट सोमय्या ( Former MP Kirit Somaiya )यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ले होत असल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई होऊ नये यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari )यांना दिले.

- Advertisement -

या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे आणि स्वतः सोमय्या यांचा समावेश होता.

२३ एप्रिल रोजी सोमय्या यांच्या वाहनावर हल्ला झाला. या हल्ल्यात सोमय्या यांच्या वाहनाची काच फुटून ते जखमी झाले. एवढी गंभीर घटना घडूनही वांद्रे पोलीस स्थानकात पोलीस उपायुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमय्या यांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला.

त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या नावाने बनावट प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून घेतला. मुंबई पोलीस आयुक्तांनी हा बनावट एफआयआर प्रसार माध्यमांना वितरीत केला. या विरोधात सोमय्या यांची तक्रारही दाखल करून घेतली गेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

हा बनावट एफआयआर तत्काळ रद्द करावा आणि या संदर्भातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या