लॉर्ड कार्नवालिस आणि त्याच्या सैन्याने अमेरिकन क्रांती सेनेसमोर शरणागती पत्कारली. ही बातमी इंग्लंडला पोहचली. त्यामुळे लंडनच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ब्रिटनचा सम्राट जॉर्ज तिसरा याला मान्य नसतांना देखील ब्रिटिश संसदेने शांतता आणि तहाची बोलणी प्रारंभ केली. मेजर जनरल बेनेडिक्ट अर्नोल्ड याने आपण क्रांती सेनेला अजूनही पराभूत करू शकतो,अशी खात्री दिली असल्यामुळे राजाला युद्ध सुरु ठेवून विजय प्राप्तीची आशा होती; परंतु अखेर राजासह सर्वांना आपला पराभव मान्य करावा लागला.
अमेरिकेच्या क्षितीजावर स्वातंत्र्याची पहाट उगवली. ही पहाट जशी आनंददायी होती, तशीच अस्वस्थ देखील होती. गुलामाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आता काय करावे? कसे जगावे? असे विविध प्रश्न सतावत असतात. स्वतंत्र होण्यापूर्वी असलेली त्याच्या जीवनाची व्यवस्था किंवा चौकट मोडलेली असते. यातनामय असली तरी त्या चौकटीला त्याचे शरीर व मन सरावलेले असते. हाताला बेडयांची सवय झालेली असते, मुक्त झालेले हात त्याला रिकामे-रिकामे वाटतात आणि डोळयासमोर एक मोठा शुन्य असतो. पुन्हा शुन्यापासून सुरवात करायची असते; परंतु आता त्याला स्वतःच्या जीवनाचे व्यवस्थापन स्वतः करायचे असते. त्यामुळे स्वातंत्र्स प्राप्तीनंतर नवीन व्यवस्था निर्माण होण्याचा काळ अत्यंत अस्वस्थतेचा व अनागोंदीचा असतो. प्रत्येक गुलाम देशाच्या वाटयाला स्वातंत्र्यानंतर हा काळ आलेला आहे. याला इतिहास साक्षी आहे.
इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्साह व आनंद सर्वसामान्य अमेरिकन जनता अनुभवत होती. तशी सर्वसामान्य जनता स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य दोन्ही अवस्थेत एकसारखेच जीवन जगत असते. कधी कधी असे वाटते की स्वातंत्र्य म्हणजे केवळ राज्यकर्ते बदलणे होय. देशाच्या सत्तेची सुत्रे आपल्या हाती असावती असे वाटणारे त्या देशातील महत्वकांक्षी लोक, काही बुद्धजीवी, भांडवलदार इत्यादी लोक हे ख-या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीला जन्म घालत असतात. सर्वसामान्यांच्या नशिबात कोणाच्याही राज्यात भरडणेच असते. त्यांना आपण गुलामीत आहोत याची जाणीव देखील नसते. स्वातंत्र्यामुळे तुमचे जीवन बदलेल अशी स्वप्नं दाखवल्याने ते काही काळ हुरळतात, स्वातंत्र्य मिळाल्याचा जल्लोश साजरा करतात. काही काळाने स्वातंत्र्यासाठी दाखवण्यात आलेल्या स्वप्नांचा त्यांना विसर पडतो आणि कोणी तरी पुन्हा नव्या स्वातंत्र्याची स्वप्नं विकायला येईपर्यंत ते झोपी जातात.
विजयापूर्वीचा हलकल्लोळ
स्वातंत्र्य लढयाचे नेतृत्व करणा-यांमध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत एकजूट व एकवाक्यता दिसते. स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र प्रत्येकाला नव्या देशाची वेसण आपल्या हाती असावी असे वाटते. येथे सत्तासंघर्षाचा प्रारंभ होतो. स्वातंत्र्ययुद्धात समाविष्ट प्रत्येक विचारधारेच्या मार्ग समाजातील भांडवलदार-धनिक-भूस्वामी उभे असतात. स्वातंत्र्यानंतर देशाला देण्यात येणा-या नव्या व्यवस्थेत त्यांना आपले हित जोपासायचे असते आणि आपली संपन्नता अधिक वृद्धिंगत करायची असते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या सोयीची राज्यव्यवस्था हवी असते. स्वातंत्र्य युद्धातील एकतेचा मुखवटा आत गळून पडतो आणि सुरु होतो तो शुद्ध सत्तासंघर्ष. अमेरिकेतही स्वातंत्र्याबरोबर हा सत्तासंघर्ष प्रारंभ झाला.
१७८३ ते १७८९ हा सुमारे सहा वर्षांचा कालखंड अमेरिकेसाठी मोठया आव्हानांचा, अस्वस्थतेचा आणि आणीबाणीचा होता. या कालखंडाचे वर्णन जॉन ॲडम्स यांनी Critical Period असे केले आहे. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंड, अमेरिका आणि जवळपास सगळयाच युरोपाचे आर्थिकदृष्टीने कंबरडे मोडले होते. युद्धावर झालेला खर्च जर पाहिला तर आपल्या हे सहज लक्षात येऊ शकते. अमेरिकन जनतेला चिरडण्यासाठी इंग्लंडने २५० मिलियन डॉलर्स (२५ कोटी डॉलर्स) खर्ची घातले. इंग्लंडला नमवून स्वातंत्र्यासाठी अमेरिकन जनतेने १५१ मिलियन डॉलर्स (१५१ कोटी डॉलर्स) पणाला लावले. इंग्लंड व अमेरिकेच्या भांडणात आपला स्वार्थ साधण्यासाठी फ्रांसने १७५ मिलियन डॉलर्सचा ( १७५ कोटी डॉलर्स) जुगार खेळला. अशा सर्व परस्थितीत या सर्व देशांच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला होता. नवजात अमेरिकेला कोणतीही शासन व्यवस्था नव्हती. स्वातंत्र्यामुळे अमेरिकेत असलेली ब्रिटिशांची शासन व्यवस्था कोलमडून पडली होती. त्यातच आर्थिक व्यवस्था संपूर्णपणे मोडीत निघाली होती.
नव्या देशासाठी असणा-या शासन व्यवस्थेसंदर्भात तीन पर्याय डोके वर काढत होते. त्यामध्ये लोकशाही,राजेशाही आणि हुकूमशाही यांचा समावेश होता. अमेकिरन स्वातंत्र्याचा जाहिरनामा साकारणा-या नेत्यांना लोकशाही हवी होती. इंग्लंडच्या राजसत्तेशी प्रामाणिक असणा-यांना राजेशाहीचे डोहाळे लागले होते, तर अमेरिकन क्रांती सेनेतील काही सेनानींना हुकूमशाही अथवा लष्करशाहीची खुमखुमी आली होती. स्वातंत्र्युद्धात अमेरिकेची शेती-व्यापार यांच्यावर मोठा परिणाम झाला होता. त्यातच लढण्यासाठी मोठया प्रमाणात कर्ज इतर देशांकडून घेण्यात आली होती. या दोन्ही गोष्टींचा परिपाक म्हणजे १७८४-८५ या काळात अमेरिकेत मोठी आर्थिक मंदी आली. अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठयावर उभा होता. अशावेळी सर्वमान्य नवीन शासन व्यवस्था आणि तिच्यासाठी राज्यघटना निर्माण होणे. अत्यंत आवश्यक होते.
व्हॅलीफोर्जचे अनोखे लसीकरण
इंग्लंडने स्वतःचा पराभव मान्य करत पूर्वेकडील अटलांटिक महासागराच्या किना-यापासून पश्चिमेला मिसिसीपी नदीपर्यंत आणि उत्तरेकडील कॅनडापासून ते दक्षिणेकडील प‹लोरिडापर्यंत सीमा असलेल्या अमेरिकेला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली होती. स्वातंत्र्यापूवीर् शासन व्यवस्था चालवणारे अमेरिकेतील इंग्रज अधिकारी-कर्मचारी आणि अमेरिकेत राहून इंग्लंड राजसत्तेची अंधभक्ती करणारे लोक (ज्यांना ‘टूरी’ असे संबोधले जाते) या दोन घटकांना एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अमेरिका उभा राहू शकतो,हा केवळ विनोद वाटत होता. त्यांना अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध म्हणजे काही प्रपंचासाठी वकिली करणारे, अनियंत्रित शेतकरी, नियमभंग करणारे व्यापारी आणि उपद्रवी कलावंत यांनी केलेला नसता उद्योग वाटत होता. हे लोक नव्या राष्ट्राची व्यवस्था लावण्यात अक्षम आहेत, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्याकडे असे मत मांडण्यासाठी एक प्रभावी मुद्दा होता. तो म्हणजे स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यात केवळ स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे; परंतु संघराज्य म्हणून असलेल्या नियमावलीचा कोणताही उल्लेख नाही.
तसेच अमेरिकेतील कोणत्याही राज्याच्या प्राथमिक संविधानात लोकशाहीचा उच्चार करण्यात आलेला नाही. त्यांचा हा मुद्दा खरा होता. १८१८ ला पुण्यात शनिवार वाडयावर युनियन जॅक फडकल्यावर, काही दिवसात पुन्हा पेशव्यांच्या हाती सत्ता येईल आणि आपले जीवन पूर्ववत होईल. अशी दिवास्वप्न पाहत अनेकजण खपले. तशीच अवस्था इंग्रज अधिकारी-कर्मचारी आणि टूरी यांची होती; परंतु काळाचे चक कधीही मागे फिरत नसते. अमेरिकेत असो की भारतात स्वातंत्र्या नंतर असे दिवास्वप्न पाहणारे अनेक होते. असे लोक दुस-या जगात पोहचले, मात्र बदलत्या जगाच्या प्रवाहाला रोखू शकले नाहीत. भारततील संस्थानिकांना भारताचे स्वातंत्र्य म्हणजे आपले वडिलोपार्जित राज्य स्वतंत्र होणे आणि आपण राजा म्हणून राज्य करणे असेच वाटत होते. त्यांची ही आशा राज्य घटनेच्या माध्यमातून धूळीला मिळाली आणि जगाच्या क्षितीजावर लोकशाही-प्रजासत्ताक भारताचा उदय झाला.
अमेरिकेच्या बाबतीतही हेच घडले होते;परंतु काही काळानंतर लोकशाही व्यवस्थाच तेथे प्रस्थापित झाली. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहिरनामा बनविणा-या बुद्धिजीवी नेत्यांनी यापूर्वी घडलेल्या सर्व क्रांत्यांचा व्यवस्थित अभ्यास केला होता. कोणत्याही क्रांतीच्या अथवा स्वातंत्र्ययुद्धाच्या मुळाशी लोकशाही मूलतत्त्व म्हणून असली तरी कालौघात त्याचे रूपांतर निरंकुशतेमध्ये होते. लोकशाहीचा पुरस्कार करणारे ग्रीक व रोमन राज्यांचे प्राचीन उदाहरण आणि अर्वाचीन काळातील इंग्लंड यांचा इतिहास या नेत्यांना ज्ञात होता. लोकशाही हवी होती; परंतु ती भविष्यात निरंकुश होणार नाही याची खबरदारी देखील त्यांना घ्यायची होती. इंग्रज अधिकारी-कर्मचारी आणि टूरी यांना जशी राजेशाही हवी होती, तसेच काही लष्करी अधिकारी-सैनिक, काही नागरिक आणि प्रशासनातील काही उच्च पदस्थ यांना लोकशाही विषयी तिटकारा होता. अमेरिकसाठी हुकूमशाहीच योग्य आहे असे वाटत होते.
क्रांतीसेनेचा बौद्धिक सरसेनापती
आपण स्वातंत्र्योत्तर भारत आणि आजचा भारत यांचा विचार केल्यास या तीन विचारधारा अखंडपणे भारतात दृष्य-अदृष्य अवस्थेत प्रवाहित असलेल्या दिसतात. लोकशाहीला निरंकुशतेकडे नेण्याचे जाणीवपूर्वक वर्तमान सुरु आहेत. अमेरिकेत २०२० च्या अध्यक्षीय निवडणूकीत लोकशाहीची वाट लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. याला कारण लोकशाही ही निरंकुशतेकडे जाऊ शकते याची जाणीव ठेवून, त्यासंदर्भात अमेरिकन राज्य घटनेत करण्यात आलेल्या उपाययोजना, कायदे, त्यांची कठोर अंमलबजावणी आणि काळानुरूप करण्यात आलेले बदल हे आहेत. अमेरिकेची एक राष्ट्र म्हणून करण्यात आलेली स्थापना आणि त्यासंदर्भातील इतिहास तसा मोठा रंजक आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या पहाटेची अस्वस्थता तिच्या भावी व स्थायी स्वस्थतेची नांदी होती.
प्रा. डॉ. राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)