पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)
पाथर्डी शहरातील साईनाथनगर उपनगरात शुक्रवारी सकाळी एका गायीने तिघांवर एकाच वेळी हल्ला केला. सुमित कलसकर हे आपल्या दोन मुलांना दुचाकीवरून नेत असताना ही घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्या एका मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.गायने कळसकर यांच्यावर हल्ला करताच रस्त्याच्या कडेला राहणारे महेश मरकड यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आपला गेट उघडला आणि कळसकर यांना मुलांसह आत घेतले. वेळीच हल्ल्यापासून बचाव केल्याने पुढील मोठा अनर्थ घडला टळला गेला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाथर्डी नगरपरिषदेच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी सोशल मीडियावरून जोरदार टीका सुरू केली आहे.हीच गाय यापूर्वीही शहरातील अनेक नागरिकांवर हल्ला चढवली आहे. नगरपरिषद प्रशासनाला या गायीची पूर्ण माहिती असून, दरवेळी तात्पुरती उपाययोजना म्हणून तिला शहराबाहेर सोडण्यात येते. परंतु काही दिवसांनी ती पुन्हा शहरात परत येऊन नागरिकांवर हल्ला करते. असा प्रकार अनेक वेळा घडला आहे. शहरातील भटक्या जनावरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे, अन्यथा येत्या काळात नागरिकांना याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. दरम्यान भटक्या कुत्र्यांचाही मोठा त्रास पाथर्डीतील नागरिकांना झाला आहे.अनेक कुत्रे नागरिकांवर धाव घेत चावा घेत आहे. मोठी दहशत या कुत्र्यांची शहरात पसरली आहे. ज्या ठिकाणी हे कुत्रे आहे तो मार्ग बदलून नागरिक पर्यायी रस्त्याचा वापर करत आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर इंजेक्शन घ्यावा लागते त्यासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयातही या इंजेक्शनला मोठी मागणी असल्याने त्याचा तुडवडा निर्माण वेळोवेळी होत आहे.
पाथर्डी शहरात भटक्या जनावरांचे कळप रस्त्यांवर फिरताना दिसतात. या जनावरांमध्ये होणाऱ्या झुंजींमुळे शहरातील वाहतूक आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होते. ही जनावरे बहुधा रस्त्यांवर बसलेली असतात, त्यामुळे वारंवार वाहतूकीला अडथळा निर्माण करून मोठी समस्या निर्माण करत आहे.गायी, वळू, कुत्रे, गाढवे अशा मोकाट जनावरांचे कळप सध्या ठीक ठिकाणी यांचा वावर आढळून येत आहे.
मोकाट जनावरे दिवसभर काहीही खाऊन भटकतात. अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला उरलेले अन्न आणि प्लास्टिकमध्ये भरलेले कचऱ्याचे पिशव्या टाकतात. त्यावर ताबा मिळवण्यासाठी गायी, कुत्री आणि डुकरांमध्ये भांडणं होतात. या गायी उरलेले अन्न खाताना प्लास्टिकच्या पिशव्या देखील गिळतात. मोकाट गायी व कुत्र्यांची दहशतने पाथर्डीकर त्रस्त झाले असून आता रोजचा झाल्याने शहरातील पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.




