Friday, May 17, 2024
Homeनगरजीएसटीविरोधात कडकडीत बंद

जीएसटीविरोधात कडकडीत बंद

अहमदनगर/पुणे |प्रतिनिधी| Ahmednagar

अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात आज व्यापारी संघटनांनी एक दिवसाचा देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे. या बंदला नगर शहरातील व्यापार्‍यांनी 100 टक्के प्रतिसाद दिला, असा दावा व्यापारी संघटना प्रतिनिधींनी केला आहे. दरम्यान, राज्यातही या व्यापारी बंदचा परिणाम दिसून आला.

- Advertisement -

यामुळे कोट्यवधींचा फटका बसला असून सोमवारपासून लागू होणारा जीएसटी मागे घ्यावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. 18 जुलैपासून पॅकिंग केलेल्या अनब्रँन्डेड अन्नधान्यासह काही वस्तूंवर जीएसटी लागू होणार आहे. त्याविरोधात आज व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे महत्त्वाच्या बाजारपेठांवर आज परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. 8 ते 10 टक्के दरवाढीचा बोजा ग्राहकांवरच पडणार आहे. निर्णयानुसार पॅकिंग केलेल्या आणि लेबल लावलेल्या डाळी, कडधान्य, आटा, रवा, मैदा, दुधाचे पदार्थ या सर्व वस्तूवर 5 टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे जीएसटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.

अन्नधान्य व खाद्यवस्तूवर जीएसटीकर लावण्यात येणार नाही, असे केंद्र सरकारने 2017 साली स्पष्ट केले होते. तेव्हा खाद्यान्न वस्तू करमुक्त होत्या. त्यानंतर ब्रँडेड वस्तूंवर कर लावला. आता तर अन्नधान्य व खाद्य वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लावल्यामुळे व्यापार्‍यांसह शेतकरी व सर्वसामान्य जनता होरपळून निघणार आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र स्वरूपाची संतापाची लाट निर्माण झाली आहे. पूर्वी जीवनावश्यक खाद्य वस्तूंवर कुठलाही कर नव्हता मात्र 18 जुलै रोजी या वस्तूंवर कर लावल्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात जीएसटी विरोधात आज बैठक पार पडली. यात शहरातील व्यापार्‍यांनी सहभाग घेतला. खाद्यान्न वर जीएसटी नकोच अशी ठाम भूमिका त्यांनी ठरवली आहे. आजच्या एका दिवसाच्या बंद मुळे केवळ पुण्यात दहा कोटींचा फटका बसला, राज्य आणि देशातील बंदचा विचार केला तर हा आकडा काही कोटीत जाणार आहे. पुढे हा आर्थिक फटका बसू द्यायचा नसेल तर सोमवारपासून लागू होणारा जीएसटीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी व्यापारी आज करत आहेत.

100 टक्के

नगर शहरात बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. आडते बाजार, दाळ मंडई, मार्केट यार्डमधील सर्व होलसेल, किराणा, अन्नधान्य, खाद्यविक्री व्यवसायिक बंदमध्ये सहभागी झाले. तसेच साखर विक्रेते संघटना, तेल विक्रेते संघटना, मिर्ची व पेंडभुसा विक्री संघटनेने बंदला पाठींबा देत बंदमध्ये सहभाग नोंदवला. आडते बाजार संघटनेचे 350 सभासद असून नगर शहरात 480 एकूण होलसेल व्यापारी आहेत. त्या सर्वांनी बंदमध्ये सहभाग नोंदविल्याची माहिती आडते बाजार मर्चंट असोशिएशनचे सचिव संतोष बोरा यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या