Wednesday, May 8, 2024
Homeजळगावडॉक्टरांच्या हलगर्जीमुळे विखरणच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे विखरणच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव  – 

शहरातील गोल्डसिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या निष्काळजी पणामुळे पवन शरद कोळी (वय 16, रा.विखरण, ता.एरंडोल) या दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा बुधवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला, असा आरोप या मृताचे वडील शरद पांडुरंग कोळी आणि मामा योगेश भगवान कोळी (नेरी, ता.जामनेर) यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, उपचारास पुरेशा वेळच मिळाला. त्यामुळे निदान होण्याच्या अगोदरच ही दुर्घटना घडली. डॉक्टरांनी कुठलाही हलगर्जीपणा केलेला नाही, असे डॉ.कल्पेश गांधी यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी दवाखान्यात डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. नातेवाईकांच्या उद्रेकामुळे दवाखान्यातील प्रशासनाने शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना पाचारण केले. त्यामुळे दवाखान्यासमोर आणि आतसुद्धा रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलीस निरीक्षक अरुण निकम स्वतः हजर राहून परिस्थितीवर नजर ठेवून होते.

तापाचा त्रास
पवन कोळी यास काही दिवसांपूर्वी तापाचा त्रास होता. त्यामुळे त्यास एरंडोल येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यास शाहूनगरातील गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास दाखल केले. रुग्णाला दाखल केल्यानंतर त्यास सलाइन व त्यातून एक इंजेक्शन देण्यात आले.

दवाखान्यातच मृत्यूचा आरोप
थोड्या वेळाने त्या रुग्णाचे शिवम सिटी स्कॅन सेंटर येथून सिटी स्कॅन करण्याचे सांगण्यात आले. पण, त्यावेळी रुग्णाची काहीही हालचाल होत नव्हती. शरीर थंड झालेले होते. त्याचा मृत्यू दवाखान्यातच झालेला होता. रुग्ण पवनची काहीच हालचाल होत नव्हती, म्हणून डॉक्टरांना प्रकृतीबाबत विचारले असता, घाबरण्यासारखे काही नाही, म्हणून सांगण्यात आले. चिंताजनक परिस्थितीतही त्यास बाहेर सिटी स्कॅन करायला पाठवले. त्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन व डॉक्टरची सुविधा नव्हती.

या रुग्णाला सिटी स्कॅन सेंटरमध्ये नेण्यात आले असता त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली. यात रुग्णाचा मृत्यू झालेला असल्याचे तेथील वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. त्यानंतर मृतदेह पुन्हा त्या दवाखान्यात आणण्यात आला. या रुग्णाचा दवाखान्यातच मृत्यू झालेला होता, असा दाट संशय होता, असा गंभीर आरोप पवनच्या नातेवाईकांनी केला. तसेच उपचारासाठी अडीच लाख रुपये खर्च लागेल, असा अंदाज डॉक्टरांनी सांगून पैशांची तरतूद तातडीने करण्याचे सांगितले होते. त्यानुसार सायंकाळपर्यंत 50 हजार रुपयांची तरतूद करणार होतो, असे पवनचे मामा योगेश कोळी यांनी सांगितले.

नातेवाईकांचा उद्रेक
या घटनेमुळे नातेवाईकांनी आक्रोश करीत दवाखान्यातील काउंटरवर आदळआपट करीत संताप व्यक्त केला. नेमके काय झाले? हे जाणून घेण्यासाठी संंंबंधित डॉक्टरांना भेटून बोलण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला. पण, संतप्त जमाव बघून डॉक्टर नातेवाईकाला भेटण्यास तयार नव्हते. तर नातेवाईक संताप व्यक्त करीत डॉक्टरांच्या कॅबीनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना डॉक्टरांच्या कॅबीनमध्ये जाता येत नव्हते.

शवविच्छेदन इन कॅमेरा करा!
रात्री उशिरापर्यंत दवाखान्यात संतप्त स्थिती होती. त्यामुळे बुधवारीच शवविच्छेदन करता आले नाही. आता हे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे, अशी मागणी पवनच्या नातेवाईकांनी केली. त्यामुळे आता हे शवविच्छेदन गुरुवारी धुळे किंवा औरंगाबादला होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

मेंदूज्वरची शक्यता
रुग्णाला दवाखान्यात दाखल केले, तेव्हा त्यास ताप आणि झटके येत होते. झटके थांबवण्यासाठी त्यास सलाइन व त्यातून एक इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर त्यास बाहेर सिटी स्कॅनसाठी पाठवले असता त्याचा मृत्यू झाला. उपचारात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केलेला नाही. उपचारासाठी जवळपास फक्त 45 मिनीट मिळाले. आजाराबाबतच्या तपासण्या, रिपोर्ट, सिटी स्कॅन होण्याअगोदरच दुर्घटना घडली. त्यामुळे निदान होण्यास पुरेसा वेळेही मिळाला नाही. मृत्यूचे कारण शवविच्छेदनातून स्पष्ट होईल. पण, त्यास मेंदूज्वराचा त्रास असावा, असा प्राथमिक अंदाज आहे, असे डॉ.कल्पेश गांधी यांनी सांगितले.

विखरण येथे पवन याच्या घराजवळ सर्व गावकर्‍यांनी गर्दी करून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. तो सरस्वती माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वीत शिकत होता. घटनेची माहिती मिळताच अनेक शिक्षकदेखील त्याच्या घराजवळ आले होते. गावावर शोककळा पसरली असून संध्याकाळच्या चुलीदेखील पेटल्या नव्हत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या