Thursday, May 2, 2024
Homeब्लॉगतास झोपेचा...!

तास झोपेचा…!

शीर्षक वाचून दचकलात का..?

हो शाळेत जसे अनेक विषयाच्या अध्यापनाचे वेळापत्रक आहेत. त्या विषयाचे शिकणे सुरू असते. अधिक गतीमानतेने शिकण्यासाठी शाळेत झोपेचा देखील तास असायला हवा. मुल शाळेत आल्यावर प्राथमिक स्तरावर आणि विशेषत पहिली , दुसरीच्या वर्गातील मुले शाळेत काहीकाळ बसली, थोडीफार शिकली की लगेच झोपेची तंद्री येते. मुले शाळेत येतात तेव्हा एका मुक्त वातावरणातून औपचारिक वातावरणात येतात.

- Advertisement -

एका ठिकाणी बसून त्याला काय हवे यापेक्षा आपल्याला काय हवे तेच शिकत असतो. शिक्षणासाठी पंचज्ञान इंद्रीये व पंचकर्म इंद्रीय यांचा फारसा वापर होत नाही. तर केवळ डोळे व कान यांचा अधिक वापर होतो. विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे विद्यार्थी बौध्दीक दृष्टया लवकर थकतात. खरेतर शिक्षणांच्या प्रक्रियेत सर्व इंद्रीयांचा अधिकाधिक वापर झाला तर विद्यार्थी थकणार नाहीत.

त्यातच औपचारिक शिक्षण प्रक्रियेमुळे विद्यार्थी लवकर थकतात त्यामुळे शाळेत खरच झोपेचा तास असायला हवा. तस झाले तर मुले अधिक शिकतील. विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर दप्तर ज्या पध्दतीने ठेवतात त्याचे निरिक्षण केले, की त्यांना शिकण्यात आऩंद मिळाला नाही हे स्पष्ट होते.

अलिकडे गुणवत्तेचा पाठपुरावा करण्यासाठी शाळा सकाळी इतक्या लवकर सुरू होतात की विद्यार्थ्यांची झोपच होत नाही. सकाळी सहा वाजता शाळेत जायचे असेल, तर विद्यार्थ्यांना साडेचार ते साडेपाच वाजता उठावे लागते. त्यातच अलिकडे दूरचित्रवाहिन्रूयांचा परिणाम म्हणून घरातील पालकही लवकर झोपत नाही. विद्यार्थ्यी असलेला अभ्यासामुळे रात्री लवकर झोपत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी झोपच मिळत नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संपादन व आकलन क्षमतेवर होतो हे निश्चित आहे.

सकाळी आलेले विद्यार्थी मधल्या सुटटीनंतर वर्गात आल्यानंतर झोपेच्या आहारी गेलेले दिसतात. मात्र शाळेत झोपेची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे शिकूनही शिकणे होत नसल्याचे दिसते. मानसशास्त्र हे सांगत आले आहे, की उत्तम मानसिक आरोग्याकरिता चांगली झोप हवी आहे. जिन हॉर्न आणि युवेन हॅरिसन यांनी केलेल्या संशोधनात असे निष्कर्ष आले आहे , की ज्यांना पुरेशी झोप मिळालेली नाही, त्यांची विचार प्रक्रिया, निर्णयक्षमता, कल्पनाशक्ती, एखादा घटक शिकल्यानंतरचे आकलन होण्याचा वेगावर झालेले दिसतो. मात्र त्याच वेळी झोप घेतलेल्या समूहापेक्षा या विद्यार्थ्यांचे शिकणे कमी असल्याचे समोर आले आहे.

झोप न झाल्यांने नवे स्विकारण्यासाठी लागणारी मानसिक स्थिती तयार होत नाही. त्यामुळे संपादन देखील कमी होणार हे निश्चित. खरेतर आपण दिवसभर जे काही काम करतो त्या कामाच्या संबंधीने मेंदूचे रात्री काम सुरूच असते. आपण झोपलो म्हणजे आपला मेंदू झोपला असे होत नाही. त्याचे काम रात्रंदिन सुरूच असते. आपण दिवसभर जे काही काम करतो त्या कामावरती मेंदू विचार करून प्रक्रिया करीत असतो. त्यामुळे व्यक्ति लहान असू दे नाही , तर व्यक्ति मोठी असू दे. जितकी झोप चांगली असेल तितके शिकणे आणि कामाची गती अधिक असेल.

कमी झोप म्हणजे अधिक वेळेचा उपयोग असे वाटत असले, तरी तो वापरला गेलेला वेळ फारच गुणवत्तेचा असेल असे नाही. त्याचा अर्थ शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रूग्न मृत्यू पावला अशी स्थिती असते. त्यामुळे यशाच्या गमक हेच आहे की पुरेशी झोप असायला हवीच. पुरेशी झोप न झाल्यांने विद्यार्थ्यांच्या शिकण्यावरती विपरित परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थी शाळेत आला, की त्याचे शिकणे खरच उत्तम व्हावे या करीता झोपेचा तास ठेवायला हवा.शेवटी बियाने उत्तम असून चालणार नाही तर त्या करीता जेथे पेरणी करायची आहे ती जमीन सुपिक असायला हवी. त्यामुळे शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या मेंदूवर ताण नको, तर शिकण्याकरीता आऩंददायी मानसिक स्थिती असायला हवी. चलातर प्रयोग करून पाहूया..

एक तास झोपेचा घेऊन पाहूया…

शेवटी काय तर मन करारे प्रसन्न..सर्व सिध्दीचे कारण…!

– संदीप वाकचौरे

(लेखक- राज्य अभ्यासक्रम पुनर्रचन समिती सदस्य / बालभारती कार्यगटाचे सदस्य आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या