Thursday, May 2, 2024
Homeनगरपहिली ते बारावीपर्यंच्या विद्यार्थ्यासाठी सोमवारपासून टिव्हीवरून पाच तास अध्यापन

पहिली ते बारावीपर्यंच्या विद्यार्थ्यासाठी सोमवारपासून टिव्हीवरून पाच तास अध्यापन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अद्याप संपलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी आजपासून (दि.14, सोमवार) दुरदर्शनच्या डी.डी. सह्याद्रीवरून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज पाच अध्यपान करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

- Advertisement -

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीद्वारे शैक्षणिक तासिका प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या तासिका या पहिली ते बारावीच्यापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहेत. राज्यामध्ये करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे करोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे.

यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शौक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यासाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दैनिक 5 तास (300 मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. हे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:30 ते दुपारी 3:30 या वेळेमध्ये डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता दहावी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता बारावीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या या संकेतस्थळावर प्रदशित केले जाणार आहे.

शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी कोड स्कॅन करून अथवा येथे क्लिक करून संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. डी.डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या फ्री डीशवर 525, डिश टिव्हीवर 1229, व्हिडीओकॉन डीटूएचवर 769, टाटा स्कायवर 1274, हेटवे या चॅनेलवर 513 या क्रमांकवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाच्या तासिका दिसणार आहेत. या उपक्रमाचा अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालक टेमकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या