अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बनावट विद्यार्थी व शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून यंदा झेडपीसह खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्यात येणार आहे. इयत्ता दुसरी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची यात पटपडताळणी करण्यात येणार असून ही पडताळणी नियतकालिक मूल्यांकन चाचणीच्या (पॅट) परीक्षेच्या दिवशी 11, 15 आणि 22 एप्रिलला रोजी घेणार आहे. तसेच यंदा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही पटपडताळणी होणार आहे. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 531 तर खासगीच्या 490 अशा इयत्ता दुसरी ते नववी आणि अकरावीच्या अशा चार हजार शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची पडताळणी होणार आहे.
राज्याच्या शिक्षण संचालनालयाकडून यंदा प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पुन्हा पटपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2013 व 2015 मध्ये पटपडताळणी करण्यात आली होती. त्यावेळी अनेक बनावट शाळा व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सापडले होते. त्याचधर्तीवर यंदा पुन्हा पटपडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार प्रथम इयत्ता दुसरी ते आठवी, नववी आणि अकरावीचे हजेरीपट, प्रत्यक्ष उपस्थिती पडताळण्यात येणार होती. मात्र, आता ही पटपडताळणी पॅट परीक्षेच्या दिवशी म्हणजे 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी होणार आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये ही पटपडताळणी होणार असल्याने शिक्षकांकडून याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. आता ही पटपडताळणी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आला आहे.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणीही 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या पटपडताळणीसाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक, लेखाधिकारी अधीक्षक शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकचे अध्यक्ष व विस्ताराधिकारी इत्यादींची नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान, बोगस विद्यार्थी शोधण्यासाठी राबविण्यात येणारी ही मोहीम यापूर्वी दोनवेळा राबविण्यात आली होती. त्यानंतर शाळांमध्ये बोगस विद्यार्थी शोधण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबतचे आदेश शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. या पटपडताळणीच्या तयारीसाठी गुरूवार (दि. 9) रोजी सर्व शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागातील संबंधीत अधिकार, कर्मचार्यांची ऑनलाईन बैठक घेत सुचना दिल्या.
नगर जिल्ह्यातील स्थिती
– जिल्हा परिषदेच्या शाळा 3 हजार 531
– खासगी शाळा 490
अन्य शासकीय अधिकार्यांची नेमणूक
11, 15 आणि 22 एप्रिल रोजी होणार्या पटपडताळणीला शिक्षण विभागासह जिल्हा परिषदेच्या अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी शिक्षण संचालक पालकर व शरद गोसावी यांनी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
1 हजार 142 शाळांना दिलासा
11, 15 आणि 22 एप्रिल रोजी होणार्या पटपडताळणीत द्विशिक्षकी किंवा 60 पेक्षा कमी पट असणार्या शाळांना वगळण्याच्या सुचना ऑनलाईन बैठकीत देण्यात आलेल्या आहेत. नगर जिल्ह्यात अशा 1 हजार 142 शाळा असून या शाळांना या पटपडताळणीतून सुट मिळणार का? याकडे शिक्षक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
हजर, गैरहजर विद्यार्थ्यांची घेणार नोंद
पटपडताळणीसाठी शाळेस भेट देणारे पथक स्टुंडट पोर्टल लॉगिंनचा वापर करून हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करणार आहेत. शाळांची पटपडताळणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, अधिक्षक शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते, वेतन व भविष्य निर्वाह पथकाचे अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांच्यासह अन्य अधिकार्यांचे पथक शाळांना प्रत्यक्षात भेटी देवून पटपडताळणी करणार आहेत.
या शाळांची होणार पटपडताळणी
जिल्हा परिषद, राज्य मंडल स्वयं अर्थशासित प्राथमिक व माध्यमिक शाळा, अशंत: अनुदानीत शाळा आणि माध्यमिक शाळा.





