मुंबई । Mumbai
चंद्रपूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून, ११ पैकी ७ जागांवर काँग्रेसने वर्चस्व मिळवले आहे. भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाला आता मुनगंटीवार यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “जर मुनगंटीवारांना निवडणुकीत ताकद कमी पडली असेल, तर त्याची भरपाई आम्ही आगामी महानगरपालिका निवडणुकीत करू. पूर्ण ताकदीनिशी आम्ही चंद्रपूर महानगरपालिका निवडून आणू.” फडणवीसांच्या या विधानावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “ताकद नसतानाही मी अनेक कामे करतो आणि आजवर केली आहेत. प्रश्न ताकदीचा नसून कार्यकर्त्यांच्या भावनेचा आहे.”
सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाच्या वेगावर बोट ठेवत पक्षाला घरचा आहेर दिला. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर हे चारही जिल्हे नेहमीच भाजपच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मात्र, एवढी वर्षे कष्ट करूनही विकासाचा जो वेग अपेक्षित होता, तो दिसत नाही. तसेच प्रशासकीय स्तरावर छोट्या निर्णयांना विलंब होत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षातील ‘इनकमिंग’ आणि वाढत्या गटबाजीवरही मुनगंटीवारांनी सडकून टीका केली. ज्या लोकांनी सरसंघचालकांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करत पत्र दिले होते, अशा लोकांना पक्षात प्रवेश का दिला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात गटबाजीला पोषक वातावरण निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. चुकीच्या व्यक्तींना पक्षात स्थान दिल्याने मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे संकेत त्यांनी दिले.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची दारे कोणासाठीही बंद नसावीत, अशी भूमिका मांडली. “पक्ष हा विना दाराचाच असला पाहिजे, फक्त प्रवेश देताना व्यक्ती योग्य आहे की नाही हे तपासले पाहिजे. राज्याभरातील विजयावरून स्पष्ट होते की पक्षाने दिलेले प्रवेश फायदेशीर ठरले आहेत,” असे फडणवीसांनी ठामपणे सांगितले.
या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर ते महाराष्ट्रभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपमध्ये कोणीही कायमस्वरूपी नाराज राहू शकत नाही, त्यामुळे सर्वांच्या भेटी घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन दिग्गज नेत्यांमधील हे वाकयुद्ध राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.




