Friday, May 3, 2024
Homeनगरउसाच्या नवीन जातींची लागवड करून दर एकरी उत्पादन वाढवावे - डॉ. हापसे

उसाच्या नवीन जातींची लागवड करून दर एकरी उत्पादन वाढवावे – डॉ. हापसे

अकोले |प्रतिनिधी| Akole

ऊस हे बहुवार्षिक पीक असून बदलत्या काळात येणार्‍या नवनवीन जातींची लागवड करून दर एकरी अधिकाधिक ऊस उत्पादन वाढवावे, असे आवाहन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ व ऊस पैदासकार डॉ. रमेश हापसे यांनी केले.

- Advertisement -

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित परिसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हापसे बोलत होते. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर होते.

डॉ. रमेश हापसे यांनी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी शिफारस केलेल्या जातींचीच ऊस लागवड करावी, को- व्ही.एस.आय.-18121, व्ही.एस.आय.-8005, 3102, को-86032 या जातींची लागवड अकोले तालुक्यात करावी, बेसल डोससह एकूण चारवेळा खतांची मात्रा द्यावी, बेणे प्रक्रिया, किड-रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, दोन टिपरीतील अंतर, लागणीच्या पध्दती याबाबत सविस्तर सोदाहरण मार्गदर्शन केले.

स्मार्टकेम टेक्नॉलॉजीस (महाधन) खत कंपनीते सहाय्यक जनरल मॅनेजर योगेश म्हसे यांनी रास्यानिक खतांचे महत्त्व, उसासाठी महाधनच्या विविध मिश्रखतांचे पॅकेजेस कसे उपयुक्त आहेत, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. स्मार्टकेमची नीमकोटेड व सुक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतांबाबतचे महत्त्व योगेश म्हसे यांनी विषद केले.

यावेळी चेअरमन सिताराम गायकर म्हणाले, अगस्ती कारखान्याचा गळीत हंगाम जोरदारपणे सुरू असून प्रतिदिन 3600 मे.टन याप्रमाणे पूर्णक्षमतेने चालू आहे. आर्थिक अडचणीत असला तरी शेतकर्‍यांचे ऊस पेमेंट, कामगार पगार, तोड व वाहतुकदार यांची बीले वेळेवर दिली जातील, असा विश्वास दिला.

कारखान्याच्या संचालक मंडळाने शेतकर्‍यांच्यासाठी अशा प्रकारचा परिसंवाद आयोजित केल्याबद्दल आमदार डॉ. किरण लहामटे यांनी धन्यवाद देवून आदिवासी विभागासाठी ऊस लागवडीसाठी लक्ष द्यावे, असेही सूचित केले.

स्वागत कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर यांनी करून दिला. कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर, ज्येष्ठ संचालक मीनानाथ पांडे, संचालक अशोकराव देशमुख, सौ. सुलोचना नवले, विक्रम नवले, प्रदीप हासे, मच्छिंद्र धुमाळ, मनोज देशमुख, शेतकरी संघटनेचे शरद देशमुख तालुका कृषी अधिकारी माधव हासे, शांताराम वाळुंज, सुभाषराव येवले, भरत हासे, सुरेश देशमुख, देवराम सावंत, मनोहर मालुंजकर, चंद्रकांत पोखरकर, रामनाथ आरोटे यांच्यासह तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी ऊस उत्पादक, सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य लेखापाल एकनाथ शेळके यांनी केले. यावेळी चीफ इंजिनिअर रमेश पुंडे, लेबर ऑफीसर गणेश आवारी, मुख्य शेती अधिकारी, सतीश देशमुख, अगस्ती सर्व सेवा संघाचे सचिव उल्हास देशमुख, वाहन विभाग प्रमुख बाळासाहेब शेटे, पर्चेस ऑफीसर दत्तात्रय आवारी, स्टोअर किपर के.पी. पवार यांच्यासह अनेक अधिकारीही उपस्थित होते.

शेतकरी सभासद व ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या विविध ऊस विकास योजनांचा लाभ घेऊन ऊस उत्पादन वाढवावे. ऊस लागवडीच्या तंत्रज्ञानाची पुस्तके, ग्रंथालयात व मुख्य शेतकी कार्यालयात उपलब्ध करुन दिली जातील, असेही गायकर यांनी सांगितले. तर कोणत्याही परिस्थितीत अगस्ति कारखाना बंद पडू देणार नाही,असा विश्वास अगस्तीचे चेअरमन सिताराम पा. गायकर यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या