Monday, January 12, 2026
HomeनगरRahuri : उसाला तुरे आल्याने तोडणी मजुरांकडून आर्थिक लूट; शेतकरी दुहेरी संकटात

Rahuri : उसाला तुरे आल्याने तोडणी मजुरांकडून आर्थिक लूट; शेतकरी दुहेरी संकटात

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यात सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून ऊस तोडणीला वेग आला आहे. मात्र हा वेग शेतकर्‍यांसाठी दिलासादायक ठरण्याऐवजी आर्थिक अडवणूक आणि लुटीचा नवा अध्याय ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.ऊस तोडणी मिळवण्यापासून ते कारखान्याच्या गेटपर्यंत पोहोचेपर्यंत शेतकर्‍यांना पद्धतशीरपणे आर्थिक फटका बसत आहे. तसेच उसाला तुरे आल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत मोठी भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

- Advertisement -

यावर्षी कारखान्यांकडून ऊस तोडणी व वाहतुकीचे दर वाढवून निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, ऊस तोडणीसाठी शेतकर्‍यांनी थेट ऊसतोड मजुरांना पैसे देऊ नयेत व ही रक्कम थेट बिलातून वजा केली जाईल, अशा स्पष्ट सूचना कारखान्यांनी ऊसतोड मजूरांना व टोळी मुकादमांना दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात या आदेशांना ऊसतोडणी मजूर व संबंधित यंत्रणांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. ऊसतोडणी मजूर थेट शेतकर्‍यांकडे क्षेत्रानुसार अतिरिक्त पैशाची मागणी करत आहेत. शेतकर्‍यांनी ही रक्कम देण्यास नकार दिल्यास ऊस तोडणीस विलंब केला जातो किंवा तोड थांबवली जाते. परिणामी शेतकर्‍यांचा ऊस शेतातच पडून राहतो आणि त्यांचे मोठे नुकसान होत आहे.

YouTube video player

परिसरातील ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात तुरे आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांतील वातावरणातील बदलाचा प्रतिकूल परिणाम पिकांवर झाला आहे. गळीत हंगाम सुरू असूनही अनेक शेतकर्‍यांना वेळेवर ऊस तोड मिळत नाही. त्यातच उसाला तुरे आल्यामुळे वजन कमी होणार असून, शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चालू वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे परिसरात ऊस लागवडीचे प्रमाण वाढले आहे. मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी दर, वातावरणातील बदल आणि तोडणीतील अडचणी यामुळे ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कारखानादारांनी ऊसतोडणी मजूरांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

बहुतांश कारखान्याकडे ऊसतोडणीसाठी यंत्र उपलब्ध आहे. परंतू कमी क्षेत्र, रस्ते यामुळे यंत्राने ऊसतोड काही ठिकाणी शक्य नसल्याने हे ऊसतोडणी मजूर याचा गैरफायदा घेऊन शेतकर्‍यांना वेठीस धरत आहेत. तसेच ऊसाला तुरे आल्याने वाढे जनावरे खात नसल्याने ऊसतोडणी मजूर शेतकर्‍यांना त्यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या चार्‍यासाठी पैसे मागत आहे. यामुळे शेतकरी ऊस शेतीला वैतागला असून तो ऊस शेतीपासून दुरावत चालला आहे.

शेतकर्‍यांना भुर्दंड
ऊस तोडणी कामगार फडात येण्यापूर्वीच मुकादम व मजूर शेतकर्‍यांकडे पैशाची मागणी करत आहेत. तसेच ऊस वाहतुकीसाठी रस्त्याने लागणार्‍या ‘टोल’चाही भुर्दंड शेतकर्‍यांना बसत आहे. तसेच ऊस वाहतूक करणार्‍या वाहनाच्या वाहनचालकाच्या जेवणाचा खर्चही शेतकर्‍यांकडून वसूल केला जात आहे.

ताज्या बातम्या

बस-रिक्षा अपघातात तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू, चार जण जखमी

0
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar अंजनेरी शिवारात आज सकाळी झालेल्या अपघातात तीन वर्षीय बालिका ठार झाली. त्र्यंबकेश्वर हून नासिक कडे जाणाऱ्या बस( Mh 14 BT 2719...