मुंबई । Mumbai
अहमदाबाद येथील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या एअर इंडियाचे अनुभवी कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या पार्थिवावर मंगळवारी (17 जून) मुंबईत शोकपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव सकाळी त्यांच्या पवईतील राहत्या घरी आणण्यात आले, ज्यानंतर सकाळी 9 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर चकाला स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडले.
सुमित सभरवाल यांचे वडील सोडले तर कुणीही जवळचे नातेवाईक नसतानाही त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो मित्र, सहकारी आणि शेजारी सहभागी झाले होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी आयुष्यात अनेक घट्ट नाती जोडली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण हवाई क्षेत्रात शोककळा पसरली असून, सोशल मीडियावरूनही अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
८ हजार तासांचा अनुभवी वैमानिक
६० वर्षीय कॅप्टन सुमित सभरवाल हे एअर इंडियात दीर्घकाळ सेवा करणारे एक विश्वासार्ह आणि अनुभवी वैमानिक होते. त्यांनी ८,००० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव घेतलेला होता. ते मुंबईतील पवई परिसरात आपल्या ९० वर्षीय वडिलांसोबत राहात होते. त्यांच्या आईचे निधन तीन वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांचे लग्न झाले नव्हते. निवृत्तीनंतर संपूर्ण वेळ वडिलांना द्यायचा त्यांचा मनसुबा होता. शेजाऱ्यांनी सांगितले की, कॅप्टन सुमित नियमितपणे वडिलांसह परिसरात फेरफटका मारत असत. ते अत्यंत नम्र, शांत आणि मदतीस तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व होते.
AI 171 अपघाताची पार्श्वभूमी
१२ जून रोजी दुपारी, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी AI 171 हे ड्रीमलायनर विमान उड्डाण करत होते. विमानात कॅप्टन सभरवाल यांच्यासह को-पायलट क्लाईव्ह कुंदर, 10 केबिन क्रू सदस्य आणि 230 प्रवासी होते. मात्र, टेकऑफनंतर काही सेकंदांतच विमानात यांत्रिक बिघाड झाला आणि विमान कोसळले.
दुपारी 1:39 वाजता, रनवे 23 वरून टेकऑफ करताना कॅप्टन सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपत्कालीन संदेश पाठवला: “Mayday, Mayday, Mayday… No Power, No Thrust, Going Down.” यानंतर काही क्षणांतच विमानाचा संपर्क तुटला आणि ते बी. जी. रुग्णालयाच्या वसतिगृहावर कोसळले. या दुर्घटनेत अनेक नागरिकांचेही प्राण गेले.
तपास सुरूच
अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर हस्तगत करण्यात आले असून, ते सध्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (NIA), नागरी विमान उड्डाण महासंचालनालय (DGCA), एअर ट्रान्स्पोर्ट सेफ्टी ब्युरो (ATS) आणि इतर यंत्रणा संयुक्तरीत्या तपास करत आहेत. अपघाताचं नेमकं कारण अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
एक जबाबदार वैमानिक गमावला
कॅप्टन सुमित सभरवाल यांचे निधन हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण एव्हिएशन क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. अनेकांनी त्यांना केवळ एक कुशल पायलट म्हणून नव्हे, तर एक उत्तम माणूस म्हणूनही ओळखलं. त्यांच्या अकस्मात जाण्याने त्यांच्या सहकाऱ्यांसह असंख्य जिवलग मित्रांनी भावना व्यक्त केल्या आहेत.





