Sunday, November 3, 2024
Homeशब्दगंधपाऊस आणि मी...

पाऊस आणि मी…

अरूणा सरनाईक

निसर्ग बदलतोय. वर्तवलेल्या तारखेला पाऊस येईलच याची खात्री राहिलेली नाही. दिलेला शब्द पाळलाच पाहिजे असे कुठे बरे लिहिलेय? असा तो उलट प्रश्न आपल्याला विचारू लागलाय. पण खरे सांगू या वाट बघण्यात एक आनंद आहे. शांत बसावे आणि आकाशाला निरखावे काळे मेघ कुठे दिसतात का ते शोधावे.

- Advertisement -

अचानक एक दिवस काहीही पूर्वसूचना न देता पावसाचे आगमन होते आणि सोसलेला उन्हाचा तडाखा काही क्षणासाठी का होईना विसरला जातो. झाडांकडे बघावे तर ते आनंदाने अगदी कमरेत वाकून वाकून येणार्‍या पहिल्या पावसाचे स्वागत करताना दिसून येतात. निसर्गाचा हा नवलोत्सव आणि स्वागत समारोह दरवर्षी नव्याने अनुभवाला येतो. पाऊस आणि शालेय सत्राचे आगमन, सुुरुवात ही एकमेकांशी निगडीत आहे. उन्हाळ्याची सुट्टी संपते. शाळा सुरू होते. पूर्वी शाळा आणि पाऊस गळ्यात गळे घालून, हातात हात घालून यायचे. शाळेचा पहिला दिवस रेनकोटशिवाय, छत्रीशिवाय भिजत जाण्यात किंवा शाळेतून घरी येताना भिजत येण्याचा असायचा. पावसातून पुस्तकांना कसेबसे वाचवत, रस्त्यावरील पाण्यात एकमेकींशी दंगा करत चालणारी आमच्या मैत्रिणींची सर्कस आजही डोळ्यांसमोर आहे. तसेच शाळेच्या मधल्या सुट्टीत रफवहीच्या पानांच्या होड्या बनवून त्यावर स्वत:चे नाव लिहून शाळेच्या पटांगणात साचलेल्या पाण्यात होड्या सोडताना होणारा आनंद आजही आठवणीत आहे. हम भी कभी रईस थे. जहाँ पानीपर जहाज चलाते थे.

लहानपणीच्या पावसाला निरागस स्पर्श असतो. पावसात भिजल्यावर कपडे वाळायचे ते फक्त क्वचित येणार्‍या उन्हात. अशावेळी कधी गरज पडली तर मैत्रिणीचे कपडे वापरावे लागत. पण त्यात कमीपणा वाटत नसे. सहजच घाल गं, तुला छान दिसतोय हा स्कर्ट असा आपुलकीचा स्पर्श असायचा. दरवर्षी पाऊस त्या पुन्हा पुन्हा नव्याने आठवायला मदत करतो. और जीनेको क्या चाहिए. कसा असतो पाऊस? लहानपणाच्या आठवणी आठवून देणारा. प्रौढपणी तरुणपण जपणारा. क्षणात तो उष्णतेचा निचरा करतो… क्षणात हसवतो… क्षणात उदासही करतो. तो वर्तमानात बरसतो…पण बालवयापासून तो या क्षणापर्यंतच्या आठवणींची साखळी सहज जोडून देतो. खरेच तो मोठा जादुगार आहे. तो आपल्या मनाचा समुपदेशक आहे. समजावत राहतो. म्हणून वाटते, पाऊस सखा, मित्र, सहोदर, समुपदेशक आहे. या सार्‍या नात्यांच्या बंधनात तो आपल्याला त्याच्याशी घट्ट बांधून घेतो. रात्रीच्या निवांतपणात कधी संवादी, तर कधी मौन राहून आपला एकटेपणा दूर करतो. खिडकीतून पाऊस बघत बसावे. मनात काही बाही आठवत राहावे. पावसाशी नवीन नाते जोडावे आणि त्या नात्याशी स्वत:ला जोडत राहावे… ते पावसाच्या थेंबासारखे मनात झिरपत, गारवा देत राहते. स्वत:च मी पण नव्याने समजावून सांगत. कधी कधी तर शिक्षक बनवून तो आपल्याला शहाणे करत राहतो.

पाऊस असतोच मनकवडा. तो आला की त्याला स्पर्श करावासा वाटतो. पावसाच्या धारा सुरू झाल्या की, नकळत मान वर होते. हाताची ओंजळ होते. त्याला झेलण्याचा, पकडून ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. थांबणार नाही, बोटांच्या फटीतून तो निघून जातो. पण क्षणकाळाच्या त्या पावसाच्या थंड मधूर स्पर्शाने संजीवनीचा एहसास होतो. निसर्गाची एक अबोल बोली आहे. ती फक्त आपल्याला समजायला हवी. बीज पेरतो शेतकरी, रोपे तयार होतात. फुलतात, फळतात, पक्व होतात, अधिक्याने उभारून येतात. ते बीज संपत नाही तर नव्या रूपाने पुऩ्हा स्वत:शी स्वत:ला जोडत जातो. शेतकर्‍याला त्या बीजाचे स्मरण राहतच ना. किती प्रकाराने निसर्गात जोडणे-तुटणे सुरूच असते. कोणत्याही प्रकारचे शिबिर, सेमीनार न घेता निसर्ग आपले विहित कार्य करत असतो. त्याची नाळ त्या कार्याशी जोडलेली असते. तिथे तुटले तरी दूर न जाण्याची किमया असते. हे तत्त्व उमगले की जोडणे आपोआप येते, शिकावे लागत नाही. आपल्यातच असते. नव्हे आहेच. कालच्या अवचित आलेल्या पावसाने माझ्या सख्याने पुन्हा एकदा मलाच माझ्याशी जोडून दिले. थँक्यू मित्रा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या