बारामती । Baramati
महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या नजरा लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati By Election 2026) राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने विजय संपादन केला असून, हा देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम ठरला आहे.
या विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत बारामतीकरांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, “हा विजय म्हणजे आदरणीय अजितदादांच्या स्मृतींना आणि त्यांनी केलेल्या विकासाच्या कार्याला दिलेली खरी आदरांजली आहे. त्यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक होती आणि दादांच्या उपस्थितीची उणीव मला आज प्रकर्षाने जाणवत आहे”.
या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचे वर्चस्व इतके प्रचंड होते की, त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या एकाही उमेदवाराला १ हजार मतांचा टप्पाही ओलांडता आला नाही. चर्चेत राहिलेल्या करुणा मुंडे यांना केवळ १२५ मते मिळाली, तर अभिजीत बिचुकले यांना १२१ मतांवर समाधान मानावे लागले.
बारामतीचा सामाजिक सलोखा आणि जिव्हाळा कायम राखण्यासाठी कोणताही जल्लोष न करता, लोकांच्या कामातूनच आपण हा विजय साजरा करूया, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तरुणाई, शेतकरी आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून बारामतीचा विकास करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. बारामतीकरांच्या या विश्वासाने राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांचे स्थान आता अधिकच भक्कम झाले आहे.





