मुंबई | Mumbai
राज्यात गाजलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महायुती सरकारला (Mahayuti Government) मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज एक ट्वीट करत ही माहिती दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली. उच्च न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा निकाल कायम ठेवण्यात आला. पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केला नाही, म्हणून त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघनप्रकरणात कारवाई होते का, ते बघावे लागेल. उच्च न्यायालयाने याप्रकरणात एका आठवड्यात गुन्हा दाखल करा, असे आदेश सरकारला दिले होते”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
तसेच “सर्वोच्च न्यायालयानेही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात (Case) गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. याशिवाय न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे राज्य सरकार, पोलीस आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरांना आरोपी करण्याची मागणी करणार आहोत. कोर्टाचा आदेश असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही जे.जे. रुग्णालयातील (JJ Hospital) डॉक्टरांना आरोपी करा, अशी मागणी करणार आहोत”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नेमकं काय घडलं होतं परभणीत?
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी परभणीत तीव्र आंदोलन केले आणि बंद पुकारला होता. या बंदला अचानक हिंसक वळण लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच लाठीचार्जही करण्यात आला.याचवेळी मूळचा लातूरचा आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले.
त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अवघ्या दोनच दिवसांत पोलीस कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमनाथच्या आईने या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या याचिकेवर सोमनाथची बाजू मांडली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.




