मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण, नवा गृहमंत्री कोण यावरून महायुतीत नाराजी नाट्य सुरु असताना दुसरीकडे शरद पवार राजकीय वर्तुळाला चकीत करून सोडत आहेत. कारण, सागर बंगल्यावर सोमवारी दुपारी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी हजर झाले. सुरेश म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंनी दोन दिवसांपूर्वी सर्व बैठका रद्द करून गावी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा शरद पवारांनी त्यांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिंदेंच्या भेटीला पाठविले होते. आता पुन्हा शिंदेंनी बैठका रद्द केलेल्या असताना पवारांनी आपल्या खासदाराला फडणवीसांच्या भेटीला पाठविल्याने चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असले तरी त्यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कमोर्तब करण्यात आलेले नाही. त्यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होणार का? हा प्रश्नही अद्याप निकाली निघालेला नाही. अशा परिस्थितीत सागर बंगल्यावर काँग्रेस वगळता इतर पक्षांतील नेत्यांची ये जा सुरू आहे. दरम्यान, सुरेश म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. बाळ्या मामा यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचे सांगितले. मात्र, बाळ्या मामा आणि फडणवीसांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात महायुतीचे जुळत नसताना नवीनच समीकरण जुळविण्याचा तर प्रयत्न होत नाहीय ना असा सवालही राजकारण्यांच्या मनात घोळू लागला आहे. अद्याप सरकार बनलेले नाही, त्यात शरद पवारांचे आमदार, खासदार महायुतीच्या नेत्यांची भेट का घेत आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागला आहे.
भाजपचे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, हे आता जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून सागर बंगल्यावर लगबग दिसत आहे. मंत्रीपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांनी सागर बंगल्यावर आज फडणवीसांची भेट घेतली. यामध्ये माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, अतुल सावे, प्रतापराव चिखलीकर ,चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचा समावेश आहे.