अहमदाबाद। Ahmedabad
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज, ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या ऐतिहासिक महामुकाबल्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, मैदानाबाहेरील वातावरण चांगलेच तापले आहे. पत्रकार परिषदेत न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने भारतीय चाहत्यांच्या भावनांबाबत केलेल्या विधानाला भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सामन्यासंदर्भात बोलताना मान्य केले की, त्याचा संघ या अंतिम सामन्यासाठी ‘फेव्हरिट’ नाही. मात्र, सँटनरने एक खळबळजनक विधान करत म्हटले की, जर न्यूझीलंडने पहिले टी-२० विश्वविजेतेपद पटकावले आणि त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवरील लाखो भारतीय चाहते दुःखी झाले, तर त्यांना त्याचे काहीही वाटणार नाही. “काही लोकांचे हृदय तुटले तरी आम्हाला फरक पडत नाही, आम्ही केवळ आमच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणार आहोत,” असे सँटनर म्हणाला. या विधानावर जेव्हा सूर्यकुमार यादवला विचारण्यात आले, तेव्हा त्याने सँटनरची खिल्ली उडवत म्हटले की, “सगळे एकच ओळ पाठ करून आले आहेत, त्यांना काहीतरी वेगळे बोलायला सांगा.”
भारतीय संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या निवडीबाबतही सध्या मोठी चर्चा सुरू आहे. विशेषतः फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या फॉर्मबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात वरुणने ४ षटकांत तब्बल ६४ धावा खर्च केल्या होत्या. त्याचा हा खराब इकॉनॉमी रेट पाहता, अंतिम सामन्यात त्याच्या जागी अनुभवी कुलदीप यादवला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने उघडपणे वरुण चक्रवर्तीची पाठराखण केली आहे.
वरुणच्या फॉर्मबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, यात काळजी करण्यासारखे काहीही नाही. “क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि संघात ११ खेळाडू असतात. दररोज प्रत्येक खेळाडूची कामगिरी सर्वोत्तम होईलच असे नाही. एखाद्या खेळाडूचा दिवस वाईट असू शकतो, पण संघ म्हणून आम्ही एकमेकांच्या कामगिरीची भरपाई करतो,” असे म्हणत सूर्याने वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक विजयाला महत्त्व दिले. सूर्यकुमारच्या या विधानानंतर आता अंतिम सामन्यात वरुण चक्रवर्तीला कायम ठेवले जाते की कुलदीप यादवची एन्ट्री होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहमदाबादच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, संध्याकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात टॉसची भूमिकाही निर्णायक असेल. कोट्यवधी भारतीयांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या असून, भारतीय संघ तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.




