Thursday, May 2, 2024
Homeनगरटाकळीभान येथील अवैध व्यवसाय बंद करा

टाकळीभान येथील अवैध व्यवसाय बंद करा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे पोलीस चौकीच्या 50 फूट अंतरावर अवैध व्यवसाय सुरू असून प्रशासन व पोलिसांंचा अवैध व्यवसाय करणार्‍यांवर वचक राहिला नसल्याने सर्व अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होत असून अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब रणनवरे व संदीप जाधव यांनी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे कि, टाकळीभानमध्ये मटका, जुगार, सोरट, दारू विक्री असे अवैध व्यवसाय अनेक वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहेत. हे अवैध व्यवसाय करणार्‍या लोकांना प्रशासन किंवा कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे अनेकदा गावात वाद होऊन गावची शांतता भंग पावत आहे. अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणातही सातत्याने वाढ होत आहे. अवैध व्यवसाय बंद व्हावेत यासाठी काही नागरिकांनी उपोषणेही केली आहेत.

मात्र त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही व उपोषणकर्त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. अवैध व्यवसाय हे पोलीस चौकीच्या 50 फुटाच्या अंतरावर सुरू असताना स्थानिक प्रशासनही त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. अवैध व्यवसायामुळे मोलमजुरी व काबाडकष्ट करणारे मजूर पैशाची उधळपट्टी करीत असल्याने त्यांच्या कुटुंबाची नेहमीच उपासमार होत आहे.

या अवैध व्यवसायामुळे तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ओढले जाऊन स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावात सुरू असलेले सर्व अवैध व्यवसाय बंद करावेत व अवैध व्यवसाय करणारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या