टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान टेलटँकजवळ असलेल्या पाझर तलावाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याला वाहून जाण्याला मार्ग नसल्याने हे पाणी त्या परिसरातील शेतकर्यांच्या उभ्या पिकात साचत असल्याने शेती पिकांचे नुकसान होत असून जलसंपदा विभागाने बाधित क्षेत्राचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अन्यथा याबाबत मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा बाधित शेतकर्यांनी तहसीलदार व जलसंपदा विभागाला निवेदनाव्दारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभान टेलटँकच्या खाली जलसंंपदा विभागाचा पाझर तलाव आहे. टेलटँकच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून हा पाझर तलाव दरवर्षी भरला जातो. तर पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर त्यातून निघणारे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे ओव्हरफ्लोचे पाणी थेट त्या परिसरातील शेतकर्यांच्या उभ्या पिकात साचले जाते. मोठ्या प्रमाणात पाणी उभ्या पिकात साचत असल्याने उभी शेती पिके सडून जात आहेत. हे प्रत्येकवर्षी खरीप हंगामात घडत असल्याने या परिसरातील शेतकर्यांना वर्षानुवर्षे मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
यास पुर्णतः जलसंपदा विभाग जबाबदार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करून त्वरीत कारवाई झाली नाही तर बाधित शेतकर्यांच्यावतीने मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, भाऊसाहेब नानासाहेब पवार, सुभाष सिताराम ब्राम्हणे, रामकिसन साळुंके, प्रेमसिंग परदेशी, सखाहरी लांडगे, लताबाई सांबारे, भिकाजी लांडगे, देवीदास बनकर, गंगाधर लांडगे, गोपिनाथ शेळके, भिमाबाई यादव, बाबासाहेब शेळके, सविता बनकर, ज्ञानदेव शेळके आदींच्या सह्या आहेत.