Thursday, May 2, 2024
Homeनगरटाकळीभान गटात इच्छुकांचा पुन्हा हिरमोड

टाकळीभान गटात इच्छुकांचा पुन्हा हिरमोड

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

जिल्हा परीषद गट व पंचायत समिती गणात सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात वाढलेला एक जि. प. गट व दोन पं. स. चे गण रद्द होणार असल्याच्या शक्यतेने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांचा पुन्हा हिरमोड झालेला दिसत आहे. गट रचनेत परत तोडफोड होऊन इच्छुकांमध्ये पुन्हा एकदा आरक्षण सोडतीची धाकधूक वाढली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात जिल्हा परिषद गटांची संख्या वाढल्यामुळे पुर्नरचनेत श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे पाच गट तर पंचायत समितीचे दहा गण अस्तित्वात आले होते. गट व गण वाढल्याने पुर्वीच्या गट व गणांची पुनर्रचना झाल्याने मोठी तोडफोड झाली होती. टाकळीभान गटात सर्वच नवीन मातब्बर गावांचा समावेश झाल्याने निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित झाले होते. गेल्या पंधरवाड्यात गट व गणाची आरक्षण सोडतही झाली होती. या सोडतीत या गटातील अनेक इच्छुकांची संधी हुकल्याने हिरमोड झाला होता. त्यामुळे या सोडतीवर हरकती दाखल झाल्या होत्या. हरकतींचा जिल्हाभर पाऊस पडल्याने व तांत्रीकदृष्ट्या आरक्षण सोडतीत त्रुटी राहिल्याने आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत.

मंत्रीमंडळाच्या 3 ऑगष्ट रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदांचे वाढविलेले गट रद्द करुन जुन्याच 2017 च्या गटांच्या रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश काढल्याने नव्या रचनेनुसार वाढीव गटात संधी मिळणार्‍या इच्छुकांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. शिवाय गट व गणनिहाय फेर आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. जुन्या गट व गणांच्या रचनेनुसार टाकळीभान जि. प. गटात व गणात तोडफोड होणार की पुर्वीची परीस्थिती जैसे थे राहील याबाबत सध्या जोरात काथ्याकुट सुरु आहे.

इच्छुक उमेदवार वेगवेगळी गणितं मांडून गोळाबेरीज करण्याच्या कामात गुंतले आहेत. नव्या पुनर्रचनेनुसार इच्छुकांनी या गट व गणात घेतलेली मेहनत फोल ठरल्याने उत्साही इच्छुकांना काहीसा आर्थिक भुर्दंडही बसला आहे. जाहीर होणार्‍या गट व गणात पुन्हा जोर बैठका काढाव्या लागणार असल्याने इच्छुकांमध्ये गोंधळाची परीस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. मात्र आता नव्याने जाहीर होणार्‍या गट आणि गणांच्या रचनेसाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार असून या गटातील व गणातील काही इच्छुकांचे ताबुत थंड होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या