Friday, May 3, 2024
Homeनगरटाकळीमिया ग्रामसभेत पाणीपुरवठ्यासह विविध प्रश्नांचा भडीमार

टाकळीमिया ग्रामसभेत पाणीपुरवठ्यासह विविध प्रश्नांचा भडीमार

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे झालेल्या ग्रामसभेत पिण्याच्या पाणीपुरवठ्यासह विविध प्रश्नांवरून सत्ताधार्‍यांवर प्रश्नांचा भडीमार केला.

- Advertisement -

पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. मुसळवाडी तलावातून झालेली पाणीपुरवठा योजना पूर्णपणे अपयशी ठरली असून गावाला दूषित पाणीपुरवठा होत असून शुद्ध पाणी मिळत नाही. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या जीवनाशी व आरोग्याशी खेळू नये, असा संतप्त इशारा देत गावासाठी मुळा धरणातून पाणी मिळण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.

बुधवारी ग्रामपंचायतीने येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात ग्रामसभेचे आयोजन केले होते. अधक्षस्थानी सरपंच विश्वनाथ निकम होते. कृषी सहाय्यक शिवप्रसाद कोहकडे यांनी शेतकर्‍यांसाठी शासकीय योजनांची तसेच इतर पिके व फळबाग लागवडीसाठीची माहिती दिली. मोरवाडीसाठी अधिकची नवीन पाईपलाईन व पाण्याची टाकी मंजुरी मिळाली; परंतु त्यासाठी पाणीपुरवठा समिती व टाकी बांधण्याची जागा का निश्चित केली नाही? हा प्रश्न उपस्थित करून अंगणवाडीसाठी नवीन वीज कनेक्शन देण्याचा मागील सभेत प्रस्ताव होता तो का केला नाही? हा विषय गरजेचा असताना ग्रामपंचायतमध्ये सीसीटीव्ही बसवणे गरजेचे होते का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर ग्रामविकास अधिकारी म्हणाले वीज कनेक्शन देणे यासाठी कुठलाही निधी मिळत नाही परंतु सोलरच्या माध्यमातून याची पूर्तता करावी लागेल.

गुलाब निमसे यांनी ग्रामसभेला गावात असणारे विविध प्रशासकीय प्रतिनिधी उपस्थित राहात नाहीत मग संबंधित विभागाचे प्रश्न कुणाला वाचारायचे? तसेच ग्रामपंचायतीचे दोन-चार सदस्य उपस्थित राहतात.वॉर्डात असलेल्या समस्या कुणाला विचारणार? अशा गैरहजर राहणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. एकंदरितच ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत गलथान कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

मंगलताई शिंदे यांनी वॉर्डातील सदस्य निवडून दिले. ते कधीच वॉर्डात आले नाहीत. आमच्या समस्या कधी विचारल्या नाहीत. काम होत नसतील तर त्यांनी राजीनामे दिले पाहिजे, अशी मागणी केली.

प्रताप जाधव यांनी कचरा गाडीचा मुद्दा उपस्थित करून नवी गाडी घेताना दोन वर्षे जुनी गाडी खरेदी केली यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच आरोप केला.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय आधिकार्‍यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रात नोकरवर्ग कमी आहे. तरीही स्वच्छता व इतर सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उपसरपंच किशोर मोरे यांनी सांगितले की, मुळा धरणातून पाणी योजना जलजीवन मिशन अंतर्गत होणार असून खा. सदाशिव लोखंडे याच्याकडे सदर प्रस्ताव दिला आहे. तो त्यांनी संबधित पाणीपुरवठा मंत्री यांचेकडे सादर केला आहे.

सदर मुसळवाडी पाणी योजना मागील काळात मंजूर झाली व त्याचवेळेस ती पूर्ण होत होती त्याचवेळी पाणीपुरवठाही सुरू झाला होता. त्यावेळी समितीही गठीत केली होती. त्यावेळेस कुणी तक्रार का केली नाही? त्या योजनेला आम्हाला का जबाबदार धरले जात आहे? असा सवाल सुरेश भानुदास करपे यांनी केला. अनेक समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. सर्व प्रश्नावर उपसरपंच किशोर मोरे व ग्रामविकास अधिकारी श्री. निमसे यांनी उत्तरे दिली.

यावेळी सुभाष करपे, शिरीष निमसे, सुनील शिंदे, अ‍ॅड रावसाहेब करपे, राजेंद्र गायकवाड, शिवशंकर करपे, सुभाष जुंदरे, डॉ. संजय कुलकर्णी, सुधाकर शिंदे,गुलाब निमसे, योगेश करपे, सिद्धांत सगळगिळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी, इतर प्रशासकीय प्रतिनिधी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या