Monday, May 6, 2024
Homeनगरतलाठी भरती परीक्षा : 15 डिसेंबरपर्यंत गुणवत्ता यादी

तलाठी भरती परीक्षा : 15 डिसेंबरपर्यंत गुणवत्ता यादी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यात आली असून, त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. एकत्रित हरकती करून 31 ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना गुण कळणार आहेत; तसेच गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्यात तलाठी भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार तलाठी पदासाठी नुकत्याच परीक्षा घेण्यात आल्या आहेत. आता प्रतीक्षा तलाठी परीक्षेच्या गुणांसह अंतिम गुणवत्ता यादीची आहे. राज्यात चार हजार 466 तलाठी पदांसाठी सुमारे आठ लाख 56 हजार उमेदवार परीक्षेला बसले होते. ही परीक्षा 57 टप्प्यांत घेण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे.

उमेदवारांना उत्तरपत्रिकेबाबत हरकती नोंदविण्याची संधी दिली आहे. येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती एकत्रित करण्यात येणार आहे. हरकत नोंदविण्यासाठी 100 रुपयांचे शुल्क लावण्यात आले आहे. एकत्रित केलेल्या हरकती या प्रश्नपत्रिका तयार करणार्‍या गटाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी 31 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका जारी करण्यात येईल. त्यानुसार, उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळाले हे कळणार आहे, असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले.

तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पुढील महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील,असेही आनंद रायते यांनी सांगितले.

उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास त्यानुसार उत्तरपत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. हरकतीसाठी घेतलेले 100 रुपये शुल्क संबंधित उमेदवाराला परत करण्यात येईल. राज्यपालांच्या हस्ते 26 जानेवारी 2024ला उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारीत उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे निश्चित केली जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या