नवी दिल्ली | New Delhi
देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांचा निकाल (Result) जाहीर होत आहे. या पाचही ठिकाणचे चित्र आता स्पष्ट होत आहे. पाचपैकी पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरी या तीन राज्यांत भाजपची (BJP) सत्ता येताना दिसत आहे. तर केरळमध्ये काँग्रेस आणि तामिळनाडूत अभिनेता विजय थलपती यांचा पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता आहे. अशातच तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन (M.K.Stalin) यांचा कोलाथूर मतदारसंघातून धक्कादायरित्या पराभव झाला आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार व्हीएस बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव केला आहे. त्यामुळे ते जाएंट किलर ठरले आहेत. अभिनेता विजय थलपती यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम'(TVK) पक्षाला विधानसभेच्या २३४ जागांपैकी १०७ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर स्टॅलिन यांच्या पक्षासह काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे.
हे देखील वाचा : Tamil Nadu Assembly Election 2026 : अभिनेता विजय थलपतीला ‘या’ आश्वासनांनी सत्तेपर्यंत पोहोचवलं; तामिळनाडूत TVK नंबर एकचा पक्ष कसा बनला?
दरम्यान, विजय यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांमुळे तामिळनाडूत (Tamilnadu) बरीच चर्चा झाली होते. हीच आश्वासने त्यांना विजयापर्यंत पोहोचविण्यासाठी गेमचेंजर ठरल्याचे सांगितले जात आहे. थलपती यांनी मुलींना लग्नावेळी आठ ग्राम सोने आणि महिलांना मोफत सिलेंडर,राज्यातील महिलांसाठी दर महिना २५०० रूपये, पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी १५ हजार रुपयांची शैक्षणिक मदत देण्याची घोषणा केली होती.
आठ हजार मतांनी स्टॅलिन यांचा पराभव
कोलाथूर हा स्टॅलिन यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या विजय यांच्या लाटेने मुख्यमंत्र्यांनाच घरचा रस्ता दाखवला आहे. व्ही. एस. बाबू यांनी सुरुवातीच्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत स्टॅलिन यांना पराभूत केले. या पराभवामुळे द्रमुकच्या गोटात स्मशानशांतता पसरली असून, तामिळनाडूत नवीन राजकीय युगाची नांदी मानली जात आहे. स्टॅलिन यांचा सुमारे ८००० मतांनी पराभव झाला आहे.
तामिळनाडूचा राजकीय इतिहास
तामिळनाडूत नेहमीत प्रादेशिक पक्षांची ताकद राहिलेली आहे. याठिकाणी सुरुवातीला काँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यावेळी के. कामराज हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते. पण कालांतराने म्हणजेच १९५० ते १९६० च्या काळात येथे द्रविड चळवळ उदयास आली. द्रविड आंदोलनामुळे राज्यात मोठे बदल झाले. याच आंदोलनातू पुढे दोन पक्ष तयार झाले. यामध्ये एक डीएमके तर दुसरा एआयडीएमके पक्ष होय. १९६७ मध्ये डीएमके पक्षाने काँग्रेसचा पराभव केला. यानंतर पुढे १९७२ मध्ये अभिनेते एम जी रामचंद्रन यांनी एआयडीएमके पक्षाची स्थापना केली. ते पुढे मुख्यमंत्री देखील बनले. यानंतर जयललिता यांचा काळ आला. तामिळनाडूचे राजकारण हे अनेक वर्ष डीएमके आणि एआयडीएमके याच्याभोवती फिरताना दिसले. मात्र यावेळेस तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल नवा इतिहास रचताना दिसत असून, अभिनेता थलपती विजय याचा टीव्हीके पक्ष हा सर्वाधिक जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा : Election Result 2026 : भाजपची तीन राज्यांत सत्तेकडे वाटचाल; काँग्रेस आणि अभिनेता विजय थलपतीच्या TVK ला चांगले यश मिळणार!





