नवी दिल्ली | New Delhi
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये अभिनेता विजय थलपती यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम'(TVK) पक्षाने विधानसभेच्या २३४ जागांपैकी १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्याच निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने १०० हून अधिक जागा जिंकत तामिळनाडूत ‘किंग’ होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ५१ वर्षीय विजय यांनी २०२४ साली फिल्म इंडस्ट्रीतून राजकारणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
विजय यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांमुळे तामिळनाडूत बरीच चर्चा झाली. हिचे आश्वासने त्यांना विजयापर्यंत पोहोचविण्यासाठी गेमचेंजर ठरल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, तामिळनाडूत टीव्हीके पक्ष १०७ जागांवर आघाडीवर आहे. तर स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष ५८ आणि अण्णा द्रमुक पक्ष २१ जागांवर आघाडीवर आहे. तसेच भाजप दोन आणि इतर सहा जागांवर आघाडीवर आहेत. विजय थलपती यांनी मुलींना लग्नावेळी आठ ग्राम सोने आणि महिलांना मोफत सिलेंडर देण्याचे वचन प्रचारावेळी दिले होते.
हे देखील वाचा : Baramati By Election Result 2026 : विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचताच DCM सुनेत्रा पवारांची सोशल मीडियावर काळजाला भिडणारी पोस्ट
तामिळनाडूचा राजकीय इतिहास कसा राहिलाय?
तामिळनाडूत नेहमीत प्रादेशिक पक्षांची ताकद राहिलेली आहे. याठिकाणी सुरुवातीला काँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यावेळी के. कामराज हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते. पण कालांतराने म्हणजेच १९५० ते १९६० च्या काळात येथे द्रविड चळवळ उदयास आली. द्रविड आंदोलनामुळे राज्यात मोठे बदल झाले. याच आंदोलनातू पुढे दोन पक्ष तयार झाले. यामध्ये एक डीएमके तर दुसरा एआयडीएमके पक्ष होय. १९६७ मध्ये डीएमके पक्षाने काँग्रेसचा पराभव केला. यानंतर पुढे १९७२ मध्ये अभिनेते एम जी रामचंद्रन यांनी एआयडीएमके पक्षाची स्थापना केली. ते पुढे मुख्यमंत्री देखील बनले. यानंतर जयललिता यांचा काळ आला. तामिळनाडूचे राजकारण हे अनेक वर्ष डीएमके आणि एआयडीएमके याच्याभोवती फिरताना दिसले. मात्र यावेळेस तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल नवा इतिहास रचताना दिसत असून, अभिनेता थलपती विजय याचा टीव्हीके पक्ष हा सर्वाधिक जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा : Election Result 2026 : भाजपची तीन राज्यांत सत्तेकडे वाटचाल; काँग्रेस आणि अभिनेता विजय थलपतीच्या TVK ला चांगले यश मिळणार!
विजय यांनी काय आश्वासने दिली होती?
१) तामिळनाडूत लग्न करताना प्रत्येक मुलीला ८ ग्रॅम सोने सरकारकडून देण्यात येईल. ही सरकारी मदत म्हणून कुटुंबाला भेट दिली जाईल. विजय यांच्या पक्षाने सोन्यासोबत मुलींना लग्नासाठी एक साडी आणि इतर भेटवस्तू दिल्या जातील असं जाहीर केले होते.
२) राज्यातील महिलांसाठी दर महिना २५०० रूपये देण्यात येतील. त्याशिवाय वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींची पेन्शन दरमहा ३ हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल.
३) वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला सहा एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे ‘अन्नपूर्णा सुपर सिक्स’ योजनेतील आश्वासन महिला मतदारांच्या मनाला भिडल्याचे बोलले जात आहे.
४) पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी १५ हजार रुपयांची शैक्षणिक मदत देण्याची घोषणा केली.
५) महिलांचा प्रवास सुकर आणि स्वस्त व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवासाचे आश्वासन देण्यात आले होते.
६) मूलभूत सुविधांअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी २०० युनिट मोफत वीज, नळाद्वारे पिण्याचं पाणी आणि सहा मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचं आश्वासन दिले. याशिवाय मजुरांसाठी, अंगणवाडी सेविकांना १८ हजार रुपये, स्वच्छता कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये देण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला.
७) तरुणांना आकर्षित करण्यासाठी पदवीधरांना ४,००० रुपयांची बेरोजगारी मदत केली जाईल. तसेच इंटर्नशिपसाठी ५,००,००० लोकांना भरती करण्याचे आश्वासन दिले होते. पुढील पाच वर्षांत ५,००,००० सरकारी नोकऱ्या निर्माण करण्याची घोषणा आणि २५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते.





