अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 5 ते 15 टक्के अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत येथील एका करसल्लागाराची तब्बल एक कोटी 47 लाख 80 हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (5 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर शहरात राहणारे 50 वर्षीय फिर्यादी हे करसल्लागार म्हणून व्यवसाय करतात. फिर्यादीनुसार, 4 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर ते एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी झाले. या ग्रुपमध्ये स्वतःला जयेश वर्मा असे सांगणार्या व्यक्तीने शेअर मार्केट ट्रेडिंगचे मार्गदर्शन केले. काही दिवसांनंतर त्यांना दुसर्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आले. तसेच एक अॅप डाउनलोड करून त्यावर खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास 5 ते 15 टक्के अतिरिक्त परतावा मिळेल, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादींनी विविध बँक खात्यांमध्ये 4 ते 14 मे 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा जमा केल्या. सुरूवातीला आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून विविध बँक खात्यांमध्ये 47 लाख 80 हजार रूपये वर्ग करण्यात आले. त्यानंतर अहमदनगर मर्चंट्स बँकेच्या खात्यातून आणखी एक कोटी रूपयांची रक्कम आरोपीने दिलेल्या खात्यांमध्ये जमा करण्यात आली. अशाप्रकारे एकूण एक कोटी 47 लाख 80 हजार रूपयांची गुंतवणूक केल्यानंतर फिर्यादींनी परताव्याबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपीने गुंतवलेली रक्कम आणि नफा परत मिळवण्यासाठी आणखी 90 लाख रूपये जमा करण्याची मागणी केली. फिर्यादींनी ती रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवून आधीच जमा केलेल्या रकमेतून ती वजा करण्याची विनंती केली. मात्र आरोपीने त्यास नकार देत अतिरिक्त रक्कम भरल्याशिवाय पैसे परत मिळणार नसल्याचे सांगितले.
यानंतर फिर्यादींना फसवणुकीची शंका आल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सायबर क्राइमच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी येथील सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून परदेशी क्रमांक वापरणार्या जयेश वर्मा नावाच्या व्यक्तीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सत्यता तपासावी
दरम्यान, ऑनलाइन गुंतवणूक, शेअर ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली वाढत असलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवू नयेत, तसेच कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी संबंधित संस्थेची आणि अॅपची सत्यता तपासावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.




