Thursday, April 17, 2025
HomeनगरAhilyanagar : 23 एप्रिलला शिक्षक बँकेला मिळणार नवीन चेअरमन

Ahilyanagar : 23 एप्रिलला शिक्षक बँकेला मिळणार नवीन चेअरमन

सहकार खात्याकडून कार्यक्रम जाहीर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सुमारे 10 महिन्यांपूर्वी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाच्या संचालक मंडळात फूट पडून दोन गट पडले होते. यातील एका गटाने विद्यमान चेअरमन बाळासाहेब सरोदे यांच्यासोबत जात विरोधी मंडळाचे शिक्षक नेते रावसाहेब रोहकले व संजय कळमकर यांच्याशी छुपी युती करत गुरूमाऊली मंडळाच्या बापूसाहेब तांबे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, चेअरमन सरोदे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर नूतन चेअरमनच्या निवडीसाठी 23 एप्रिलला संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.

- Advertisement -

या निवडीमुळे भर उन्हाळ्यात प्राथमिक शिक्षक संघटनांमधील वातावरण तापणार आहे. 10 महिन्यांपूर्वी संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीच्यावेळी तांबे यांनी दिलेले आदेश डावलत चेअरमनपदी सरोदे यांना मतदान करण्यात आले. या घटनेनंतर गुरूमाऊली मंडळात फूट पडली होती. मात्र फुटलेले संचालक आपण गुरूमाऊली मंडळात असून पदाधिकारी निवडीत एकमत न झाल्याने मतदान होऊन त्यात सरोदे यांची निवड करण्यात आल्याचा दावा केला केला होता. दरम्यान सुमारे 10 महिन्यांच्या कालखंडानंंतर सरोदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून यामुळे रिक्त झालेल्या पदावर निवडीसाठी 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी होणार आहेत. यात सर्वप्रथम चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे, माघारीची प्रक्रिया आणि आवश्यकतेनूसार मतदान होवून त्यानंतर मतमोजणी होऊन विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर या पध्दतीने व्हा. चेअरमन पदासाठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यावेळी पुन्हा सत्ताधारी तांबे गटाचे सर्व संचालक एकत्र येणार की सरोदे यांच्यासोबत गेलेल्या गटाला तांबे गट बाजूला ठेवणार. सरोदे हे विरोधी मंडळा सोबत आपला उत्तराधिकारी निश्चित करणार की शिक्षक बँकेच्या राजकारणात आणखी काही वेगळे होणार येत्या काही दिवसात समोर येणार आहे.

बँकेचा व्यवस्थापन खर्च एक कोटींनी वाढला
गेल्या काही महिन्यांत शिक्षक बँकेच्या पदाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या पगारात 16 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिक्षक बँकेच्या तिजोरीवर दर महिन्याला 8 ते 9 लाखांचा भार वाढला. हा हिशोब वर्षभरात कोटींच्या पुढे गेला असून यातील कर्मचार्‍यांना किती पैसे मिळाले आणि कोणी कोणी यावर हात साफ केला, याचा हिशोब द्यावा, अशी मागणी गुरूमाऊलीच्या तांबे गटाच्या संचालकांनी केली आहे.

तांबे गटाच्या भूमिकेकडे लक्ष
शिक्षक बँकेच्या संचालक मंडळात फुटलेला गटा हा विरोधी मंडळाचे नेते रावसाहेब रोहकले आणि संजय कळमकर यांच्यासोबत असल्याचे दिसून आले आहे. बँकेतील सत्तेसाठी यापूर्वी अनेक प्रमुख गटाचे विभाजन झाल्याचे दिसून आलेले आहे. माजी चेअरमन रोहकले यांच्या विरोधात जी निती तांबे यांनी वापरली, तीच निती पुन्हा विरोधकांनी तांबे यांच्या बाबत वापरत त्यांना शह दिला होता. यामुळे आता तांबे गट फुटलेल्या 10 ते 12 संचालकांना जवळ करणार की 2027 च्या निवडणुकीची तयारी करणार याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sangamner : टँकरची मागणी होताच तात्काळ टँकर उपलब्ध करून द्या

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner पूर्वीच्या काळी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना होते. परंतु पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकारी यांना दिले आहेत...